पुणे : पारगावला शॉर्टसर्किटमुळे घराला आग | पुढारी

पुणे : पारगावला शॉर्टसर्किटमुळे घराला आग

पारगाव, पुढारी वृत्तसेवा : पारगाव (ता. आंबेगाव) गावठाणात शॉर्टसर्किट होऊन घराला आग लागली. ही घटना मंगळवारी (दि. 9) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. घरात कोणी नसल्याने जीवित हानी झाली नाही. मात्र, संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. या घटनेत संदीप महादेव करंडे यांचे अंदाजे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले.

बारकू सुखदेव ढोबळे यांच्या मालकीच्या इमारतीत पहिल्या मजल्यावरिल घरात संदीप महादेव करंडे हे राहतात. हे कुटुंबीय तळमजल्यावरील दुकानात काम करीत होते. मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किट होऊन आग लागली. त्यात घरातील टीव्ही, फ्रिज, पंखे जळून खाक झाले. याशिवाय कपडे, भांडी, इतर साहित्य देखील जळून गेले. शेजारी राहणार्‍या नागरिकांच्या आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी आग विझवायला सुरुवात केली. सुनील ढोबळे यांनी भीमाशंकर कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत ढगे यांना घटनेची माहिती दिली. ढगे यांनी त्वरित कारखान्याचे अग्निशामक दल घटनास्थळी पाठवले.

भीमाशंकर कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर अस्वारे, माजी उपसरपंच विठ्ठल ढोबळे, सुरक्षा अधिकारी कैलास गाढवे हे घटनास्थळी हजर झाले. अस्लूब अन्सारी, रिझवान अन्सारी, इम्रान अन्सारी यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी मदत केली.

Back to top button