पुणे : ताबूत, पंजांचे मिरवणुकीने विसर्जन | पुढारी

पुणे : ताबूत, पंजांचे मिरवणुकीने विसर्जन

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मोहरमच्या निमित्ताने शहरात बसविण्यात आलेल्या ताबूत आणि पंजांचे मंगळवारी मिरवणुकीने विसर्जन करण्यात आले. ठिकठिकाणी मिरवणूक मार्गावर सामाजिक कार्यकर्ते, तसेच नागरिकांनी ताबूत आणि पंजांचे दर्शन घेतले.
सामाजिक संस्थांतर्फे ताबूत आणि पंजांच्या मिरवणुकीत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांना सरबतचे वाटप करण्यात आले. पावसातच मिरवणूक काढण्यात आली. हजरत इमाम आणि हजरत हुसेन यांच्या स्मृत्यर्थ दरवर्षी मोहरम महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ताबूत आणि पंजांची स्थापना होते.

यंदाही पुणे शहरात ताबूत आणि पंजांची स्थापना विविध ठिकाणी करण्यात आली होती. मोहरमच्या दहाव्या दिवशी ताबूत, पंजांचे विसर्जन करण्याची प्रथा आहे. त्यानुसार विसर्जन करण्यात आले. गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे ताबूत आणि पंजांची मिरवणूक निघाली नव्हती. दोन वर्षांनंतर यंदा मिरवणुकीने ताबूत आणि पंजांचे संगमपूल येथे विसर्जन झाले. कॅम्पमधील बन्नू मुकादम ताबूत, यंग भोपळा चौक ताबूत, अलजमेतूल ताबूत, बकर कसाब ताबूत तसेच नेहरू चौकातील सुभानशहा दर्गा येथील ताबूत, पर्वती दर्शन येथील छबिल पटेल ताबूत, गुरुवार पेठेतील हर झेंडेवाले ताबूत आणि अहिल्याबाई होळकर ताबूत मिरवणुकीत पारंपरिक पद्धतीने सहभागी झाले होते.

Back to top button