पुणे : संततधारेने चारापिकांना फटका

पारगाव, पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये सलग दोन दिवस पाऊस पडल्याने चारापिके भुईसपाट झाली आहेत. सततच्या पावसामुळे चारापिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे.

तालुक्याच्या पूर्व भागात शनिवारी (दि.6) व रविवारी (दि.7) रोजी दुपारच्या वेळी दमदार पाऊस पडला. पावसाचा फटका सर्वाधिक चारापिकांना बसला आहे. मका, कडवळ ही चारापिके भुईसपाट झाली आहेत. सुरुवातीला पडलेल्या पावसाचाही फटका या पिकांना बसला होता. पिके काळी पडली आहेत. जनावरे ओला चारा खात नाहीत. बहुतांश शेतकर्‍यांनी साठवलेला वैरण, कडबा, भुईमुगाचा पालाही पावसाने भिजला आहे. आता जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

दुग्धव्यवसायावर परिणाम

परिसरात शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्धव्यवसाय मोठ्या प्रमाणात शेतकरी करतात. दूध देणार्‍या संकरित गायींची संख्या जास्त आहे. आता या गायींना चारा पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याने दूध उत्पादनात घट झाल्याचे शेतकरी सांगत आहेत.

Exit mobile version