पुणे : पोंदेवाडीतील अष्टविनायक महामार्ग समस्यामय | पुढारी

पुणे : पोंदेवाडीतील अष्टविनायक महामार्ग समस्यामय

मंचर, पुढारी वृत्तसेवा : पोंदेवाडी (ता. आंबेगाव) येथील रोडेवाडी फाटा येथे अष्टविनायक महामार्गाच्या विविध समस्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. रस्त्यावर येणारे पाणी काढून टाका व साइडपट्ट्या भराव्यात; अन्यथा मंगळवारी (दि. 9) सायंकाळी चार वाजता ग्रामस्थांकडून रोडेवाडी फाटा येथील रस्त्यावर ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला आहे.

आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज यांनी ही माहिती दिली. मागील दोन वर्षांपासून अष्टविनायक रस्ता व बेल्हा जेजुरी रस्त्याचे काम सुरू असून काम पूर्ण होत आले आहे. पोंदेवाडीतून हे दोन्ही रस्ते जात असून रोडेवाडी फाटा या ठिकाणी एकमेकांना छेदतात. याच ठिकाणी सध्या रस्त्यावर पावसाचे पाणी साचत आहे. सदरच्या रस्त्याचे काम काही दिवसांपूर्वीच पूर्ण झाले आहे. मात्र, साइडपट्ट्या व पाणी काढून दिले नाही.

रस्ता झाल्यानंतरचा हा पहिलाच पावसाळा असल्यामुळे या रस्त्यावर कुठे खोलगट भाग आहे याचा अंदाज येत नाही. परिणामी रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचून अपघात होत आहेत. विशेषतः अष्टविनायक रस्त्यावर जास्त पाणी साचले आहे. सदर कंत्राटदारांना वारंवार कळवूनही ते लक्ष देत नाहीत, त्यामुळे रोडेवाडी फाटा येथील ग्रामस्थ वैतागले असून, अनिल वाळुंज यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर मंगळवारी ठिय्या आंदोलन करणार आहे.

Back to top button