पुणे : पहाडदर्‍यातील महादेवाचे मंदिर दुर्लक्षित | पुढारी

पुणे : पहाडदर्‍यातील महादेवाचे मंदिर दुर्लक्षित

लोणी-धामणी, पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्यातील पडाडदरा परिसरातील डोंगरावर निसर्गाच्या कुशीत असलेले पुरातन महादेवाचे मंदिर आजही दुर्लक्षित असून, ते जीर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत आहे. शासनाने या मंदिराकडे लक्ष द्यावे, अशी मागणी सरपंच राजश्री कुरकुटे यांच्यासह ग्रामस्थ व भाविकांनी केली आहे.

श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी व शिवरात्रीला येथे भाविक मोठी गर्दी करतात. पहाडदरा गावच्या पश्चिमेला उंच डोंगर माथ्यावर हे पुरातन महादेवाचे मंदिर निसर्गाच्या कुशीत वसले आहे. या मंदिराकडे जाण्यासाठी अजूनही व्यवस्थित रस्ता नव्हता. ग्रामस्थांनी स्वखर्चाने कच्चा रस्ता तयार केला आहे. त्यामुळे या रस्त्याने वाहने वरपर्यंत जातात. मात्र, तरी मंदिर साधारण अर्धा एक किलोमीटर दूरच राहते.

या मंदिराकडे जाण्यासाठी अवसरी बुद्रुक जवळील हिंगे मळ्यातून एक रस्ता आहे. तो रस्ताही पहाडदर्‍यालाच येतो. शिवाय हा रस्ता डिंभे उजव्या कालव्यापासून ते मालधरा खोसापर्यंत उखडला आहे. तसेच या मंदिराला सभामंडप बांधला आहे. पण मंदिर अजूनही सरंक्षक भिंतींच्या प्रतीक्षेत आहे. धार्मिक व पर्यटनाच्या दृष्टीने हे मंदिर फारच महत्त्वाचे आहे. त्यामुळे या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्याची मागणी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष भगवान वाघ, मच्छिंद्र वाघ, संकेत वायकर व ग्रामस्थांनी केली आहे.

या मंदिराकडे सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे. या ठिकाणी रस्त्याचे काम झाल्यास हे मंदिर धार्मिक व पर्यटनस्थळ म्हणून नावारूपाला येईल.

                                         – बाळासाहेब वाघ, माजी पंचायत समिती सदस्य, आंबेगाव

Back to top button