पुणे : व्हिडीओ बनविण्यासाठी तरुणांचा जीवघेणा प्रकार | पुढारी

पुणे : व्हिडीओ बनविण्यासाठी तरुणांचा जीवघेणा प्रकार

बेल्हे, पुढारी वृत्तसेवा : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओला लाइक मिळविण्यासाठी तरुण जिवाची पर्वा न करता कोणतेही चित्तथरारक कृत्य करतात. पण, हा प्रसंग आपल्या जिवावर बेतू शकतो, असाच एक प्रकार बेल्हे (गुळुंचवाडी) येथे घडला. पुराच्या पाण्यात वाहून जाण्यापासून दोन तरुण थोडक्यात बचावले.

बेल्हे (गुळुंचवाडी) येथील गणेशनगर शिवारात रविवारी दोन तरुणांनी ओढ्याच्या पुरात मोटारसायकल घालून पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला. पण, पुरात मोटारसायकलसह दोघेही वाहून गेले. सुदैवाने पुढे ओढ्याचे पात्र पसरट असल्याने पाण्याचा वेग कमी होत ते काही अंतरावर सुरक्षितपणे पाण्यातून बाहेर पडले. त्यात ते किरकोळ जखमी झाले. नशीब बलवत्तर म्हणून दुर्घटना टळली.

गणेशनगर येथील दोन्ही तरुणांना रस्ता ओलांडू नका, मोटारसायकल ओढ्याच्या पुरात घालू नका, अशी विनंती ग्रामस्थांनी केली. पण, त्यांच्या विनंतीला फाटा देत केवळ सोशल मीडियावर चमकण्यासाठी मोटारसायकलवर स्वार होऊन मोटारसायकल पुरात घातली. मात्र, स्टंट करण्याच्या नादात नको तेच घडले असते. दोन्ही तरुणांचा प्रताप पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. हे भयानक दृश्य कॅमेर्‍यात कैद झाले आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दोन तरुण ज्यांनी आपला जीव दाव्याला लावला, त्यांना नंतर ग्रामस्थांनी कडक शब्दांत समज दिली.

Back to top button