पुणे : भीमाशंकर रस्त्याला पडले भगदाड | पुढारी

पुणे : भीमाशंकर रस्त्याला पडले भगदाड

भीमाशंकर, पुढारी वृत्तसेवा : पावसामुळे घोडेगाव-भीमाशंकर रस्त्याला गंगापूर फाट्याजवळ नेवाळवाडी येथे मोठे भगदाड पडले आहे. यामुळे सध्या या रस्त्यावर एकेरी वाहतूक सुरू असल्याने सोमवारी भीमाशंकरला आलेल्या भाविकांची गैरसोय झाली.

परिसरात रविवारी (दि. 7) सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे हा रस्ता मोरीलगत खचला. यामुळे या ठिकाणी मोठे भगदाड पडले आहे. श्री क्षेत्र भीमाशंकरला श्रावणातील दुसरा सोमवार असल्याने मोठ्या संख्येने भाविक आले होते. मात्र, रस्त्यावर भगदाड पडल्याने सध्या भीमाशंकरकडे जाणारी-येणारी वाहतूक एकेरी करण्यात आली आहे. यामुळे वाहतुकीवर परिणाम झाल्याने भाविक व वाहनचालकांची गैरसोय झाली.

घोडेगाव ते निगडाळे दरम्यान अजूनही धोकादायक मोर्‍या आहेत. यांचे रुंदीकरण करणे गरजेचे आहे. तसेच खचलेला रस्ता त्वरित दुरुस्त करून या मार्गावरील वाहतूक पूर्ववत करावी, अशी मागणी भाविक व वाहनचालकांकडून होत आहे.

स्थानिक तरुणांकडून तात्पुरती दुरुस्ती

स्थानिक तरुणांनी खचलेल्या रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती करून वाहतुकीसाठी एकेरी मार्ग मोकळा करून दिला. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या कडेने संरक्षण फिती व फलक लावून वाहनचालकांना सावध केले. यामुळे वाहतूक संथ गतीने सुरू होती.

Back to top button