पुणे : राजगडावर स्थानिक नागरिकांना व्यवसायाची संधी देण्याची मागणी | पुढारी

पुणे : राजगडावर स्थानिक नागरिकांना व्यवसायाची संधी देण्याची मागणी

भोर, पुढारी वृत्तसेवा : राजगडाला असंख्य पर्यटक भेट देतात. त्यांना जीवनावश्यक वस्तची विक्री गडाच्या परिसरातील स्थानिक नागरिक करतात. परंतु, पुरातत्व विभागाने आठ ते दहा दिवसांपासून या नागरिकांना जीवनावश्यक वस्तू विक्री करण्यास बंदी घातली आहे. यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तरी त्यांना गडावर व्यवसाय करण्यास संधी द्यावी, अशी मागणी शिवप्रेमी संघटनांनी केली आहे.

याबाबतचे निवेदन आमदार संग्राम थोपटे यांना देण्यात आले आहे. राजगड परिसरातील मळे, भूतोंडे, खुलशी, पाल, वाजेघर या रहळात राहणार्‍या मावळ्यांना गडावर व्यवसाय करण्यासाठी पुरातत्व विभागाने बंदी घातली आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपासमार करण्याची वेळ आली आहे. यामुळे या मावळ्यांना व्यवसाय करण्याची संधी देण्याची मागणी शिवप्रेमी, शिवशंभू प्रतिष्ठान, ऐतिहासिक मावळ प्रांत, बारामावळ परिवार आदी संघटनांनी केली आहे. या वेळी महेश कदम, संतोष खोपडे, सचिन खोपडे, सुधीर खोपडे, राहुल ढेबे आदी उपस्थित होते.

राजगड परिसरातील मावळ्यांनी गडावर कोणताही अनुचित प्रकार करू नये. पर्यटकांना व्यवसायाच्या माध्यमातून सेवा-सुविधा पुरवाव्यात. व्यवसाय करताना अडचण आल्यास पुरातत्व विभागाशी चर्चा करून मार्ग काढला जाईल.

                                                                                – संग्राम थोपटे, आमदार

Back to top button