पुणे : पीरबाबा वास्तूच्या दुरुस्तीचे काम सुरू | पुढारी

पुणे : पीरबाबा वास्तूच्या दुरुस्तीचे काम सुरू

नानगाव, पुढारी वृत्तसेवा : पारगाव सा. मा. (ता. दौंड) येथील पीराच्या माळावरील पीरबाबाच्या वास्तूच्या बांधकामाचा वाद पोलिस निरीक्षक नारायण पवार यांच्या मध्यस्थीमुळे सुटला. हिंदू-मुस्लिम बांधवांच्या एकत्रित विचाराने पारगावकरांनी ऐक्याचे दर्शन घडविले आहे. आता मंदिराच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे.

अनेक दिवस भिजत पडलेल्या वादाच्या विषयावर कायमचा पडदा पडला असून, गावात शांततेचे वातावरण दिसून येत आहे. बैठकीत ठरल्याप्रमाणे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कामाला सुरुवात झाली आहे. येथे अनेक वर्षांपासून सर्वधर्मसमभावाची, ऐक्याची भूमिका पाहावयास मिळत आहे. ग्रामदेवतेचा यात्रोत्सव व इतर सण-समारंभ गावातील सर्वधर्मीय समाजातील ज्येष्ठ मंडळी व युवक एकत्रितपणे साजरा करीत असतात.

पूर्वीपासून चालत आलेली ही परंपरा पुढे देखील अशीच चांगल्याप्रकारे सुरू राहील, यासाठी गावातील ज्येष्ठ व युवकांच्या माध्यमातून सतत प्रयत्न केले जातात. पीरबाबाच्या वास्तूच्या बांधकामावरून चिघळलेला वाद आता गावातील ज्येष्ठ व युवकांच्या माध्यमातून सुटला आहे. ग्रामस्थांना एकत्रितपणे घेऊन वाद मिटविण्यासाठी प्रयत्न करणारे यवत पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नारायण पवार यांचे दोन्ही समाज व ग्रामस्थांच्या वतीने आभार मानण्यात आले.

गावातील वादाचा विषय गावातच मिटविण्यासाठी गावातील हिंदू व मुस्लिम धर्मीयांनी एकत्रित घेतलेला निर्णय हा खरोखरच कौतुकास्पद आहे.

                                                              – नारायण पवार, पोलिस निरीक्षक, यवत

Back to top button