
लोणावळा; पुढारी वृत्तसेवा: बद्रीविशाल सोसायटी, तुंगार्ली येथील पुष्पा व्हिला या बंगल्यातील स्विमिंग पूलमध्ये बुडून दोन वर्षीय चिमुरड्या शिवबाचा मृत्यू झाला होता. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे 13 जुलै रोजी म्हणजे त्याच्या जन्मदिनाच्या आदल्या रात्रीच त्याचा मृत्यू झाला. ही घटना घडून 20 दिवस उलटून गेले तरीही यातील दोषींवर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता; मात्र अखेर याप्रकरणी लोणावळा शहर पोलिसांनी सहा जणांसह लोणावळा नगरपरिषदेवर देखील गुन्हा दाखल केला आहे.
मृत शिवबाचे वडील अखिलकुमार नारायणराव पवार (47, रा. 103 पर्पल ड्रीम सिटी, टाकळी रोड, नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणावळा शहर पोलिस ठाण्यात डॉ. प्रमोद काशिनाथ बहाळकर (रा. चेंबूर, पुष्पा बंगल्याचे मालक), नरेशकुमार मुरलीधर भोजवाणी व राजेश निंबाले (दोघेही रा. कैवल्यधाम रोड समोर, तुंगार्ली, लोणावळा) तसेच घटनेवेळी हॉलमधील हजर इतर तीन जण (नाव, पत्ता माहीत नाही) व लोणावळा नगरपरिषद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्या स्विमिंग पूलमध्ये ही दुर्घटना घडली तो पूल अनधिकृत होता आणि त्याकडे नगरपरिषदेने दुर्लक्ष केले होते म्हणून नगरपरिषदेवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.