पुणे विद्यापीठात आज युवा संकल्प अभियान | पुढारी

पुणे विद्यापीठात आज युवा संकल्प अभियान

पुणे; पुढारी वृत्तसेवा: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वराज्य महोत्सव व हर घर तिरंगा कार्यक्रमांतर्गत युवा संकल्प अभियानाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मंगळवारी होणार आहे. याबाबतची माहिती विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारताचा तिरंगा आपल्या घरावर फडकवण्याची ऐतिहासिक मोहीम केंद्र व राज्य शासनाने निर्देशित केली आहे. या उपक्रमात विद्यापीठ सहभागी होत आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी दत्तक गावांमध्ये हा संकल्प प्रत्यक्षात आणण्याचा निर्धार केला आहे.

750 हून अधिक महाविद्यालये, 65,000 राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक, 3000 हून अधिक प्राध्यापक यांच्या एकत्रित प्रयत्नातून 5 लाखांहून अधिक विद्यार्थी व नागरिक आणि विविध सामाजिक क्षेत्रापर्यंत पोहोचण्याचा हा प्रयत्न आहे. यावेळी प्र-कुलगुरू डॉ.संजीव सोनावणे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांच्यासह व्यवस्थापन परिषदेचे अधिसभा सदस्य उपस्थित होते.

जागतिक विश्वविक्रमाचा निर्धार…
5 लाखांहून अधिक व्यक्तींनी तिरंगा ध्वज हातात घेतलेला स्वतःच्या फोटोचा Largest Online -lbum of People Holding National Flag गिनीज जागतिक विश्वविक्रम प्रस्थापित करण्याचा निर्धारही विद्यापीठाने केला आहे. स्वतःचे व इतरांचे छायाचित्र https://spputiranga.in/photoupload/ या किंवा https://forms.gle/juJt9rtgnpo5fgZh9 या लिंकवर टाकावे.

फोटो अपलोड करताना काय कराल?
1) एका फोटोत एकच व्यक्ती असावी. शक्यतो झेंडा दोन्ही हातांनी छातीसमोर पकडून फोटो काढावा. 2) सेल्फी स्वरूपातील फोटो ग्राह्य धरला जाणार नाही. 3) चेहर्‍यावर स्वच्छ प्रकाशझोत असावा. फोटो काढताना उभे राहिल्यावर मागे स्वच्छ भिंत अथवा पडदा असावा. निसर्ग अथवा भिंतीवरील फोटो, पुतळे, सूचना अथवा नावाचे फलक असल्यास फोटो ग्राह्य धरला जाणार नाही. 4) एका व्यक्तीने वरील लिंकवरील स्वतःचा फक्त एकदाच फोटो अपलोड करावा. 5) फोटोचे आकारमान 6 ते 7 एमबी इतकेच हवे.

Back to top button