लग्नादिवशीच प्रियकर पळाला; 'काहीतरी मार्ग काढु' म्हणत प्रियकाराच्या मामाने नवरीला चारला विषारी पेढा

इंदापूर, पुढारी वृत्तसेवा: तीन वर्षापासून प्रेमसंबंध असणाऱ्या प्रेमीयुगलांची रेशीमगाठ बांधण्याच्या दिवशीच वराने पळ काढल्याने आयुष्याची स्वप्न पाहणाऱ्या युवतीचा अपेक्षाभंग झाला. असं असताना त्यात भर म्हणून वराच्या मामानेच संबंधित युवतीला सगळं काही बरं होईल म्हणून चारला पेढा अनं झाली विषबाधा. हा प्रकार इंदापूर तालुक्यातील राजवडी गावी घडला असून संबंधित युवतीने इंदापूर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार प्रियकरासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील करत आहेत.

फिर्यादीने दिलेल्या जबाबानुसार, सबंधित युवती ही गेल्या तीन वर्षांपासून उच्च शिक्षण घेत आहे. राजवडी गावातील दुध डेअरीत काम करणाऱ्या युवकाबरोबर तिचे चार वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. १५ जुलै रोजी संबंधित युवतीचे वडील, प्रियकराचे दोन्ही मामा यांनी ३१ जुलै रोजी इंदापूर शहरातील सिध्देश्वर मंदिरात त्यांचा विवाह लावण्याचे निश्चित केले. दोन्ही मामांनी पाच लाख रुपये हुंडाही मागितला. ऐन लग्नाच्या दिवशी भाचा घरातून कोठेतरी निघुन गेलाय त्यामुळे हे लग्न आता होऊ शकत नाही, असं मामांनी त्या युवतीच्या वडीलांना सांगितले. दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता राजवडी गावात एकत्र बसून काहीतरी तोडगा काढू असे सांगून ते निघून गेले.

ठरल्यावेळी संबंधित युवती व तिचे आई-वडील आणि प्रियकराचे दोन्ही मामा तसेच मावसभाऊ हे राजवडी येथे एकत्र बसून चर्चा करु लागले. दरम्यान चर्चा करत असताना वराचा मामा त्या युवतीजवळ आला. तिला बाजुला घेऊन ‘झालेला प्रकार हा खुप वाईट झाला, आपण यातून काहीतरी मार्ग काढु’ असे म्हणत त्याने त्याच्या खिशातील कागदातून एक पेढा काढला. ‘हा देवाचा पेढा आहे, तो खाल्ल्यावर सर्वकाही चांगले होईल’ असे सांगून त्यांनी आपल्यासमोरचं तो पेढा तिला खायला लावला. त्यानंतर युवती घरी गेल्यानंतर तिला त्रास होऊ लागल्याने रात्री  उपचारासाठी इंदापूरातील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले.
४ ऑगस्टपर्यंत तिला शुध्द नव्हती. शुध्दीवर आल्यानंतर, तिने कोणते विषारी औषध घेतले होते का? याची विचारणा वडीलांनी मुलीकडे केली; मात्र आपण असे काही केले नाही परंतु प्रियकराच्या मामाने पेढा खायला दिल्यानंतर आपल्याला त्रास झाल्याचे तिने सांगितले.

Exit mobile version