पुणे : ‘शिक्षकांवरील अन्याय दूर करा’; शिक्षकांचे साकडे | पुढारी

पुणे : ‘शिक्षकांवरील अन्याय दूर करा’; शिक्षकांचे साकडे

बारामती, पुढारी वृत्तसेवा : पुणे महापालिका व बारामती नगरपरिषदेच्या वाढीव हद्दीतील 76 शाळांमधील एकूण 571 शिक्षकांना जिल्हा परिषदेकडील रिक्त जागांवर वर्ग करण्याचा अट्टहास जिल्हा परिषद प्रशासनाने चालविला आहे. हा निर्णय शिक्षकांवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे या शिक्षकांना नगरपालिका, महापालिकेकडे वर्ग करण्याची मागणी बारामती तालुका प्राथमिक शिक्षक संघाने विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे केली आहे.

संघाचे अध्यक्ष हनुमंत शिंदे व सरचिटणीस सुरेंद्र गायकवाड यांनी ही माहिती दिली. 25 जुलै 2019च्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषदेकडे शिक्षक अतिरिक्त होत असतील, तर त्यांना नगरपालिका, महानगरपालिकांकडे वर्ग करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, जिल्हा परिषदेने जाहीर केलेल्या रिक्त पदांच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात शिक्षक अतिरिक्त ठरत नसल्याचा दावा प्रशासनाचा आहे. परंतु, गेली तीन वर्षे संचमान्यता नसल्याने शिक्षक अतिरिक्त होणार की आणखी पदे निर्माण होणार, याबाबत स्पष्टता नाही.

शाळा व विद्यार्थी वर्ग होत असताना शिक्षकांबाबत वेगळी भूमिका का, असा प्रश्न महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य सरचिटणीस केशवराव जाधव यांनी उपस्थित केला. वाढीव हद्दीतील सर्व 571 शिक्षकांच्या बदल्या केल्यास त्या शाळांत शिकणार्‍या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी पर्यायी व्यवस्था नगरपालिका, महापालिकेने केली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याचा धोका असल्याचे जाधव यांनी सांगितले. त्यामुळे समायोजन बदली प्रक्रिया रद्द करून शिक्षकांसह शाळा वर्ग करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना द्याव्यात, अशी मागणी संघाच्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबत शिक्षक व विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, असा निर्णय घेण्याची सूचना संबंधित अधिकार्‍यांना करण्याचे आश्वासन पवार यांनी दिले. या वेळी राजेंद्र जगताप, महादेव गायकवाड, रेवननाथ परकाळे, गणेश कुंभार, राजेंद्र बालगुडे, राहुल होळकर, बापू खरात आदी उपस्थित होते.

Back to top button