बारामतीत वाढले दुचाकी चोरीचे प्रमाण | पुढारी

बारामतीत वाढले दुचाकी चोरीचे प्रमाण

बारामती : पुढारी वृत्तसेवा : बारामती शहर आणि परिसरात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे. शहर आणि तालुका पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी वारंवार वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावत असले, तरी वाहन चोरीला आळा बसलेला नाही. यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. शहर व भोवतालच्या परिसरातील दुचाकी चोरीचे लोण आता ग्रामीण भागात पोहचले आहे. वाड्या-वस्त्यांवरूनही घरापुढे लावलेल्या दुचाकी गायब होऊ लागल्या आहेत.

दुचाकी चोरीमुळे नागरिक त्रस्त झाले असून, पोलिसांनी केवळ चोरीचा गुन्हा दाखल करून न घेता चोरांना पकडण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी वाहनमालकांनी केली आहे. बारामती शहर, तालुका आणि वडगाव पोलिस ठाण्यांत सातत्याने दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल होत आहेत. शहर व वाढीव हद्दीच्या भागांत सदनिकांच्या पार्किंगमध्ये लावलेल्या दुचाकींची चोरी होत आहे. मुख्य बाजारपेठेत पार्किंगमध्ये लावलेल्या दुचाकी क्षणार्धात गायब होत आहेत. त्यामुळे दुचाकींची सुरक्षा घ्यायची कशी, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. एमआयडीसी परिसरातील कंपन्या, पेन्सिल चौक, बारामती न्यायालय, पंचायत समिती चौक, इंदापूर चौक, भाजी मंडई, भिगवण चौक, कसबा, शहरातील बँका, शासकीय कार्यालये, रुग्णालये आणि नागरिकांच्या निवासस्थानासमोरून दुचाकी गाड्या चोरीला जात असल्याने नागरिक हतबल झाले आहेत.

पार्किंग केल्यानंतर काही वेळातच त्या चोरीला गेल्याच्या घटना शहर आणि परिसरात वारंवार घडत आहेत. काही वेळेला नव्या दुचाकीही हँडल लॉक तोडून चोरीला गेल्या आहेत. दुचाकी चोरांची मोठी टोळी कार्यरत असून, पोलिसांनी याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

टोळीचा बंदोबस्त करण्याची मागणी
वाहन चोरीला गेल्यावर पोलिस ठाण्यात जात फिर्याद दाखल केली, तरी तपासाबाबत फारशी हालचाल केली जात नसल्याची नागरिकांची ओरड आहे. मुळात दुचाकी चोरीचा शोध हे आपले काम आहे, हेच पोलिस विसरून गेले आहेत. दुचाकी चोरणार्‍या टोळ्या बारामती तालुक्यात सक्रिय असून, त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

Back to top button