वडगाव शेरी : अतिक्रमण, बेशिस्त वाहनचालकांमुळे कोंडी | पुढारी

वडगाव शेरी : अतिक्रमण, बेशिस्त वाहनचालकांमुळे कोंडी

वडगाव शेरी; पुढारी वृत्तसेवा: वडगाव शेरीतील सुंदराबाई शाळा, व्दारका गार्डन ते संघर्ष चौक आणि गणेशनगर परिसरातील रस्त्यावरील अतिक्रमण आणि बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतूक कोंडी होत आहे. वडगाव शेरीतील गणेशनगरमध्ये रस्त्यावर भाजी विक्रेते बसतात. तसेच, रस्त्यावर हातगाड्या लावून इतर वस्तूंची विक्री करतात. दुकानामध्ये येणारे वाहनचालक रस्त्यावर गाड्या पार्किंग करतात, त्यांचा अडथळा वाहतुकीला होऊन दररोज संध्याकाळी प्रचंड वाहतूक कोंडी होते. अनेकदा रस्त्यावरून जाणार्‍या नागरिकांना वाहनांचा धक्का लागून किरकोळ अपघातही होत आहेत.

सुंदराबाई मराठे शाळेजवळ खाद्य विक्री करणारे व्यावसायिकांनी रस्त्याचा बराच भाग व्यापला आहे. येथे खाण्यासाठी येणारे अनेक नागरिक आपली वाहने येथेच पार्क करतात, त्यामुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. हीच स्थिती व्दारका गार्डन ते संघर्ष चौक रस्त्याच्या दरम्यान असल्याने सायंकाळच्या वेळेस या तीनही परिसरातील रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी होत आहे.

याबाबत स्थानिक नागरिक विशाल साळी यांनी सांगितले की, दररोज संध्याकाळी सुंदराबाई शाळेजवळ वाहतूक कोंडी होते. या रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा ताण इतर रस्त्यावर येतो. रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची गरज आहे. तसेच, या ठिकाणी पोलिसांची, वॉर्डनची नेमणूक करावी, ज्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या भेडसावणार नाही.

Back to top button