पावसाअभावी भात खाचरे कोरडी, मोठा पाऊस पडणे शेतकर्‍यांना अपेक्षित | पुढारी

पावसाअभावी भात खाचरे कोरडी, मोठा पाऊस पडणे शेतकर्‍यांना अपेक्षित

टाकवे बुद्रुक : पुढारी वृत्तसेवा : मावळ तालुका भात पिकाच्या उत्पादनात नावाजलेला तालुका आहे. मात्र या वर्षी उशिरा सुरू झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी भात पिकाच्या लागवडी उशिरा झाल्या. तालुक्यात सद्यस्थितीत लावणीचे काम अंदाजे 80 टक्के झाले आहे; मात्र सध्या पावसाअभावी खाचरे कोरडी पडू लागली आहेत. त्यामुळे भातरोपे तरारण्यासाठी मोठा पाऊस पडणे शेतकर्‍यांना अपेक्षित आहे. या वर्षी काही शेतकर्‍यांनी विदयुत पंपाच्या सहाय्याने पाणी घेऊन भात रोपे तयार होती.

या शेतकर्‍यांनी जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसात तयार झालेल्या भात रोपाची लागवड करून घेतली; परंतु धूळ वाफेवर भात रोपे तयार करणार्‍या शेतकर्‍याची संख्या मोठी असून या शेतकर्‍यांनी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात धूळ वाफेवर पेरणी केली; मात्र संपूर्ण जून महिन्यात पावसाने दांडी मारली होती. जुलै महिन्यात पहिल्याच आठवड्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने धूळ वाफेवर पेरलेल्या भात रोपांच्या उगवणीत घट झाली असून विदयुत पंपच्या सहाय्याने पाणी घेऊन तयार झालेल्या रोपाची या पावसात लागवड पूर्ण झाली.

धूळ वाफेवर पेरणी केलेली भात रोपे सद्यस्थितीत लागवडीस आली आहेत; मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाने पुन्हा दांडी मारल्याने तालुक्यातील काही ठिकाणच्या लागवडी खोळंबल्या आहेत, तर भात लागवड झालेल्या खाचरात पाणी नसल्याने खाचरे भेगाळलेली आहेत. मावळ तालुक्यातील अनेक ठिकाणी परिसरात पहाणी केली असता, भात पिकाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मावळ तालुक्यात भात लागवड 12,125 हेक्टर खाली लागवड केली जाते सध्या पाऊस ने उघडीप दिल्याने आतापर्यंत आठ हजार पाचशे हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. खोळंबलेल्या लागवडी सुरु होण्यासाठी तालुक्यात पुन्हा मोठ्या पावसाची गरज आहे.
                                   -दत्तात्रेय पडवळ, मावळ तालुका कृषी अधिकारी.

Back to top button