पिंपरी : वृक्ष गणना, कोरोना महामारी, नदीसंवर्धन, ई-व्हेईकल, स्मार्ट सिटीलाही केराची टोपली | पुढारी

पिंपरी : वृक्ष गणना, कोरोना महामारी, नदीसंवर्धन, ई-व्हेईकल, स्मार्ट सिटीलाही केराची टोपली

मिलिंद कांबळे : पिंपरी : महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या सद्यस्थिती अहवालात शहरातील कोरोना महामारी, वृक्ष गणना, नदी संवर्धन योजना, ई- व्हेईकल, स्मार्ट सिटी यासह अनेक मुद्यांना स्थान देण्यात आलेले नाही. दर वर्षीचे ‘कार्य’ म्हणून अहवाल काढायचा म्हणून काढला आहे. प्रशासकीय राजवटीत पर्यावरण विभागाच्या ‘काम चलाऊ’ भूमिकेत काहीच बदल झालेला दिसत नाही.
पर्यावरण विभागातर्फे दरवर्षी शहराचा पर्यावरण सद्यस्थिती अहवाल सादर केला जातो. शहराबाबत अभ्यास करणार्‍या पर्यावरणप्रेमी, विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्त्यांना त्यांचा उपयोग होतो. त्यात शहरातील सर्व घटकांचा सविस्तर माहितीसह समावेश असावा, असे अपेक्षित आहे. मात्र, यंदा अनेक मुद्यांना सरळ फाटा देण्यात आला आहे.

पालिकेतर्फे कोट्यवधींची उधळपट्टी करून वृक्षगणना रडतखडत तब्बल 4 वर्षे करण्यात आली. त्यात तब्बल 32 लाख 16 हजार 799 झाडे असल्याचा दावा करण्यात आला. त्या संदर्भात अहवालात काहीच माहिती नाही. पुनर्रोपण केलेल्या झाडांची संख्या नाही. पवना व इंद्रायणी नदी पुनरूज्जीवन (सवंर्धन) प्रकल्प हाती घेतला आहे. एसपीव्ही कंपनी स्थापन केली आहे. तसेच, पुणे पालिकेसोबत मुळा नदी प्रकल्प राबवित आहे.

शहराची जीवनवाहिनी असलेल्या या महत्वाकांक्षी प्रकल्पासंदर्भात केवळ नऊ ओळीची माहिती देऊन त्याचे महत्व कमी केले आहे. नदी पात्रातील जलपर्णीबाबत माहिती नाही. स्मार्ट सिटी कंपनीद्वारे शहरात विविध पर्यावरणपूरक प्रकल्प राबविण्यात येत आहेत. उद्याने, सायकल ट्रॅक विकसित केले आहेत. या बाबत उल्लेख नाही. पालिकेच्या माध्यमिक तसेच, खासगी शाळा व महाविद्यालयांनाही स्थान नाही. प्लास्टिक व थर्माकोलचा वापर करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई तसेच, ग्रीन मार्शलकडून केल्या गेलेल्या कार्याबाबत माहिती नाही.

पिंपरी ते फुगेवाडी मार्गावर मेट्रो सुरू झाली असून, त्याबाबत खूपच तोकडी माहिती दिली आहे. गेल्या अहवालावर मेट्रोच्या छायाचित्रास मुख्यपृष्ठावर स्थान होते. यंदा मेट्रोच्या छायाचित्रास डच्चू दिला आहे. ग्रेडसेपरेटरची जुनी छायाचित्रे वापरली आहेत. तसेच, पालिकेने हवा शुद्ध करणारे यंत्र बसविली आहेत. प्रदूषण केल्याबद्दल दंडात्मक कारवाई होते. याबाबत अहवालात माहिती नाही.

कोरोना रुग्णांची लपवाछपवी
कोरोना महामारीचा संपूर्ण जगात उद्रेक झाला. त्यात लाखो नागरिकांचे हकनाक बळी गेले. थेट नागरिक, समाज आणि पर्यावरणावर परिणाम करणारा हा घटक आहे. त्यांचा अहवालात साधा उल्लेखही नाही. मलेरिया, डेंगी, गॅस्ट्रो, कावीळ, टायफाईड, विषमज्वर, एडस, स्वाइन फ्लू, श्वसनाचे रोग, हृदयविकार, मेंदूचे आजार, कर्करोग आदी रुग्णांची आकडेवारी दिली आहे. सन 2020-21 मध्ये 3 हजार 604 जणांचा आणि सन 2021-22 वर्षात 4 हजार 228 जणांचा नैसर्गिक मृत्यू झाल्याची नोंद आहे. मात्र, कोरोनामुळे झालेल्या 4 हजार 626 रूग्णांचे मृत्यू तसेच, साडेतीन लाखांपेक्षा अधिक रूग्णांची नोंद अहवालात लपविण्यात आली आहे.

इलेक्ट्रीक व्हेईकलकडे दुर्लक्ष
केंद्र व राज्य शासनाने इलेक्ट्रीक व्हेईकल वापरास प्रोत्साहन दिले जात आहे. ई-व्हेईकल वापर वाढावा म्हणून शहरात विविध ठिकाणी अशा वाहनांसाठी पालिका चार्जिंग स्टेशन उभारणार आहे. पीएमपीएमएलला अनेक डेपोत चार्जिंग स्टेशन बांधून देत आहे. असे वाहन पालिकेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी वापरावे म्हणून योजना सुरू केली. असे असताना पर्यावरण अहवालात वायू व ध्वनी प्रदूषण न करणार्‍या या वाहनांबाबत काहीच माहिती नाही.

पर्यावरणाचे काम काय?
महापालिकेच्या पर्यावरण विभाग काय काम करते, प्रदूषणाबाबत कोठे तक्रार करायची, त्यांना संपर्क कसा करायचा, मेल आयडी व संकेतस्थळाची माहिती अहवालात नाही. शहरातील पर्यावरण, वृक्ष व नदीप्रेमी संघटना, संस्थांची माहिती अहवालात नाही. त्यामुळे अहवाल अर्धवट असल्याचे स्पष्ट होत आहे.

Back to top button