राज्यातील केवळ दहा टक्के शाळांमध्ये ग्रंथालये; 1001 पेक्षा अधिक विद्यार्थी संख्या, मात्र एक ग्रंथपाल पद मंजूर | पुढारी

राज्यातील केवळ दहा टक्के शाळांमध्ये ग्रंथालये; 1001 पेक्षा अधिक विद्यार्थी संख्या, मात्र एक ग्रंथपाल पद मंजूर

पुणे; पुढारी वृत्तसेवा: राज्यातील केवळ 10 टक्के शाळांमध्ये आणि पुण्यातील 30 ते 40 टक्के शाळांमध्ये ग्रंथालये आहेत, तर 1001 पेक्षा अधिक विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांमध्ये फक्त एक ग्रंथपाल पद मंजूर आहे. याबाबतची माहिती पुणे जिल्हा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा ग्रंथपाल संघाचे अध्यक्ष प्रदीप बागल यांनी दिली. सध्या अनेक शाळांमध्ये ग्रंथालय आणि ग्रंथपाल नाहीत. त्यामुळे राज्यातील विद्यार्थी ग्रंथालयाच्या सुविधेपासून वंचित आहेत. पुण्यात 30 ते 40 टक्के शाळा सोडल्या तर बर्‍याच शाळांमध्ये ग्रंथालये आणि ग्रंथपाल नाहीत. अनेक शाळांमध्ये ग्रंथपालांचे पद रिक्त असून, सरकारने ही पदे भरायला हवीत, अशी मागणी केली जात आहे.

बागल म्हणाले, महाराष्ट्रात ज्या मराठी माध्यमिक शाळा आहेत, त्यापैकी फक्त चार हजार शाळांमध्ये फक्त एक ग्रंथपाल पद मंजूर आहे. उर्वरित 30 ते 35 हजार शाळा या ग्रंथपाल पदाशिवाय आहेत. या शाळांना ग्रंथालयाची सुविधा उपलब्ध नाही. राज्यातील केवळ 10 टक्के शाळांमध्ये ग्रंथालये आहेत. सध्या राज्यात 1300 अर्धवेळ ग्रंथपाल कार्यरत आहेत आणि 1500 ते 1550 पूर्णवेळ ग्रंथपाल कार्यरत आहेत. जवळपास 2850 ग्रंथपाल कार्यरत आहेत. अनेक ग्रंथपाल पदाच्या जागा रिक्तच आहेत, त्या भरल्या गेलेल्या नाहीत, तर 1000 विद्यार्थ्यांपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये ग्रंथपाल पदाला मंजुरी मिळत नाही. सरकारने विद्यार्थी संख्येची ंठेवलेली अट रद्द करावी.

काही शाळांमध्ये नावीन्यपूर्ण प्रयोग
विद्यार्थ्यांमध्ये शालेय अभ्यासक्रमापलीकडे वाचनाची गोडी लागावी, म्हणून पुस्तक वाचन स्पर्धांसह पुस्तक पेटी योजनाही राबविली जात आहे. तर शालेय ग्रंथालयातून विद्यार्थ्यांनी वाचनासाठी पुस्तके घ्यावीत, यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले जात असून, त्याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. काही शाळांमध्ये ग्रंथपालांकडून विद्यार्थ्यांना कुठली पुस्तके वाचावीत आणि कुठली नाही, यासाठी तासही घेत आहेत. आठवड्यातून एकदा ते हा तास घेत आहेत.

आमच्या शाळेत विद्यार्थ्यांनी अवांतर वाचन करावे, यासाठी त्यांना ग्रंथालयातून पुस्तके उपलब्ध करून दिली जात आहेत. विद्यार्थीही ग्रंथालयातून अवांतर वाचनासाठी पुस्तके घेत आहेत. आम्ही विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालयाचा तास घेत आहोत, त्यातून त्यांना पुस्तकाचे आणि ग्रंथालयाचे महत्त्व पटवून देत आहोत.

                      – प्रसाद भडसावळे, ग्रंथपाल, आबासाहेब अत्रे दिन प्रशाला

वयोगटानुसार विद्यार्थ्यांना पुस्तके वाचनासाठी दिली जात आहेत, पण विद्यार्थ्यांचा ग्रंथालयातून पुस्तक वाचायला घेण्यासाठी चांगला प्रतिसाद आहे. प्राथमिक विभागातील विद्यार्थी गमतीशीर कथांची पुस्तके वाचताहेत तर माध्यमिक विभागातील विद्यार्थी कथांची पुस्तके, वैज्ञानिक कथांची पुस्तके देत आहोत.

– धनश्री सोनावणे, ग्रंथपाल, अभिनव इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज

Back to top button