ऐकावे ते नवलच... विहिरीचे पाणी चोरल्याने दाखल झाला गुन्हा | पुढारी

ऐकावे ते नवलच... विहिरीचे पाणी चोरल्याने दाखल झाला गुन्हा

बारामती : पुढारी वृत्तसेवा : रोख रक्कम, साहित्य, ऐवजाची चोरी झाल्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल झाल्याचे आपण ऐकतो. परंतु बारामती तालुक्यातील सुपे येथे चक्क एका विहिरीतून पाणी चोरीला गेले आहे. कोरोना प्रादुर्भाव असताना लाॅकडाऊनच्या काळापासून या पाण्याची चोरी झाली असून या प्रकरणी सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षकाच्या फिर्यादीवरून चौघांविरोधात गुन्हा दाखल केल आहे.

सुधाकर तुकाराम रोकडे (वय ६५, रा. अंबरनाथ, जि. ठाणे) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रकाश मारुती जाधव, विकास प्रकाश जाधव, राहूल ज्ञानेश्वर जाधव व अतुल ज्ञानेश्वर जाधव या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत नमूद केल्यानुसार १० फेब्रुवारी २०२० ते ६ आँगस्ट २०२२ या कालावधीत ही घटना घडली.

रोकडे यांचे मूळ गाव सुपे असून तेथे गट क्रमांक २६४ मध्ये त्यांचे ४ हेक्टर ६७ आर शेतजमीन आहे. सेवानिवृत्तीनंतर ते अंबरनाथ येथे स्थायिक झाले आहेत. अधूनमधून गावी येत ते ज्वारीचे पिक घेत होते. कोरोना महामारीच्या काळात ते इकडे न आल्याचा फायदा घेत संशयितांनी दि. १० फेब्रुवारी २०२० रोजी वीजेच्या मीटर बसवत त्यांच्या विहिरीतील लाखो लिटर पाणी वापरले.

ही विहिर स्वतःच्याच शेतात असल्याचे सिद्ध करण्यासाठी फिर्यादीने दरम्यानच्या काळात जमीन मोजणी करत हद्द निश्चिती करून घेतली. विहिरीतील पाणी चोरल्याच्या कारणावरून फिर्यादीने त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी भेट घेतली नाही. दि. १८ फेब्रुवारी रोजी फिर्यादीने यासंबंधी प्रकाश व राहूल यांची शेतात भेट घेतली. परंतु त्यांनी अरेरावीची भाषा वापरून शिविगाळ, दमदाटी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वडगाव निंबाळकर पोलिसांनी संशयितांविरोधात भादविं कलम ४४७, ४४८, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Back to top button