वाहतूक कोंडीच्या विळख्यात भोसरी | पुढारी

वाहतूक कोंडीच्या विळख्यात भोसरी

भोसरी : पुढारी वृत्तसेवा : परिसरातील वाहतूक कोंडी कायमची सोडविण्यासाठी उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. तरीही परिसरात वाहतूक कोंडी होत असल्यामुळे भोसरीकर त्रस्त झाले आहेत. येथील उड्डाणपुलाखालील रस्त्यावर अवैधधंदे, वाहनचालकांचा बेशिस्तपणा, रस्त्यावर आडवी असणारे वाहने, चौकात थांबणारी खासगी वाहने, सेवा रस्त्यावर उभारलेले हातगाडीवाले, पथारीवाले, खाद्यपदार्थ विक्रते यांनी केलेले अतिक्रमण, बंद पडलेले सिग्नल, वाहतुकीचे विस्कळीत नियोजन यामुळे येथील रस्त्यावर नियमित वाहतूककोंडी होत आहे.

परिणामी वाहनचालकांना वायुप्रदूषण, ध्वनीप्रदूषणसह दररोज मनस्ताप सहन करावा लागत आहे. वाहतूककोंडीतून कायमची सुटका कधी होणार, असा संतप्त प्रश्न नागरिक, वाहनचालकांतून विचारला जात आहे. सतत होणारी वाहतूककोंडी सोडविण्यासाठी उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. परंतु, येथील सेवारस्त्यावर हातगाडीवाले, पथारीवले, खाद्यपदार्थ विक्रते यांनी अतिक्रमण केले आहे. तसेच, येथील पदपथावरदेखील काही दुकानदारांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे नागरिकांना पदपथाचा वापर न करता रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे.

महापालिकेचा अतिक्रमणविरोधी विभागदेखील अतिक्रमण हटविण्यासाठी कायमस्वरूपी कारवाई करत नसल्याचे नागरिक सांगतात. परिणामी वाहतूककोंडीत भर पडत आहे. त्याचबरोबर विरुद्ध दिशेने येणारे वाहने वाहतूककोंडीत आणखीन भरच घालत आहेत.

पोलिसांचे दुर्लक्ष
भोसरीतील लांडेवाडी चौक, पीसीएमटी बस डेपो, उड्डाणपुलाखालील चांदणी चौक ते अंकुशराव लांडगे नाट्यगृह, सद्गुरूनगर येथील चौक हे भोसरीतील मुख्य चौक आहेत. तसेच, भोसरी-आळंदी रोडवर तर वाहतूककोंडी नित्याची झाली आहे. त्यामुळे येथे नेहमीच वर्दळ असते. या वर्दळीवर वाहतूक पोलिसांचे कोणतेही नियंत्रण नसल्याने या सर्व प्रमुख रस्त्यावर बेशिस्तपणे वाहन चालवणारे आढळून येतात. परिणामी वाहतूककोंडी ही नित्याची बाब बनली आहे. यात भर की, काय अवजड वाहने उड्डाणपुलाचा वापर करीत नाही.त सेवा रस्त्यावरून अवजड वाहनांची ये-जा असते. त्यामुळे भोसरीतील विविध चौकांत वाहतूककोंडीचे चित्र दिसून येत आहे. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आह

Back to top button