रावणगाव : कारवाईच्या भीतीने सावकार धास्तावले | पुढारी

रावणगाव : कारवाईच्या भीतीने सावकार धास्तावले

रावणगाव; पुढारी वृत्तसेवा: दौंडच्या पूर्व भागात खासगी सावकारकीचे पेव या दै.‘पुढारी’तील बातमीने अनेक सावकार धास्तावले असून सर्वच स्तरातून या निर्भीड वृत्ताचे स्वागत करण्यात आले. मोठ्या कारवाईची अपेक्षा प्रशासनाकडून अनेकांनी व्यक्त केली आहे. खानोटा व स्वामी चिंचोली येथील दोन सावकारांच्या दडपशाहीविरोधातील वृत्तानंतर बोरीबेल, मळद, रावणगाव, नंदादेवी, लोणारवाडी व खडकी या गावांतील अनेक जण अशा खासगी सावकारांकडून त्रस्त असल्याचे चित्र पाहायला मिळाले. खासगी सावकारकी करणारांचे राजकीय लागेबांधे असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. कारवाई करताना राजकीय व्यक्तींचा हस्तक्षेप होत असल्याने अनेक जण सहसा पुढे येत नसून तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत आहेत.

व्याजाने दिलेल्या पैशांच्या मोबदल्यात जमीन खरेदीखत करून घेणे, गाडीचे पेपर ताब्यात घेणे, त्या जोरावर गाडी ओढून नेण्याची धमकी देणे, कोरे स्टॅम्प, कोरे चेक घेतल्याने अनेक जण सावकारांकडे गुंतल्याचे वास्तव आहे. पैसे दिले नाही तर जमीन परस्पर दुसर्‍याला विकून टाकू, बँकेत चेक भरून 138 दाखल करेन, अशी भीती सावकार दाखवत असल्याने अनेक जण पुढे येण्यास धजावत नाहीत. चारचाकी गाडीतून सावकारकी करणार्‍या एकाने तर पाच लाख रुपयांचे पंधरा लाख वसूल करूनही 27 लाख रुपयांची खोटी केस एकावर न्यायालयात दाखल केली आहे. लोणारवाडी (ता. दौंड) येथे काही दिवसांपूर्वी खासगी सावकारकीतुन बोगस खरेदीखत तयार करण्याचा प्रकार घडला होता. हे प्रकरण पोलिसातदेखील गेले होते, यामुळे हे लोक किती पोचलेले आहेत, हे समजणे गरजेचे आहे

खासगी सावकारकीने त्रस्त असणार्‍यांनी सहकार विभाग तसेच पोलिसांत तक्रार दाखल करावी, सावकारकीच्या जोरावर जमीन लाटण्याचे प्रकार घडले असल्यास जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे तक्रार दिल्यास सावकारकीची शहानिशा होऊन कलम 18 नुसार रीतसर कारवाई होऊन खरेदीखत रद्द करून जमीन परत मिळू शकते.

                                            – हर्षद तावरे, सहकार सहाय्यक निबंधक, दौंड.

Back to top button