पुणे : लष्करी जवानासह दोन जणांचा मृत्यू; पालिकेच्या ट्रकने चिरडले | पुढारी

पुणे : लष्करी जवानासह दोन जणांचा मृत्यू; पालिकेच्या ट्रकने चिरडले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: महापालिकेच्या कचरा वाहतूक करणार्‍या ट्रकच्या धडकेत सैन्य दलातील एका जवानासह दोघांचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-सोलापूर रस्त्यावरील रेसकोर्स परिसरात घडली. हनुमंत दगडू काळे (वय 43), दत्ता पोपट काळे (वय 40, दोघे रा. आढळगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी ट्रकचालक इसरार अहमद मोहम्मद इलियास शेख (वय 40, रा. शिवाजीनगर) याला अटक करण्यात आली. पोलिस कर्मचारी राजाराम कलजी यांनी याबाबत वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हनुमंत काळे हे सैन्य दलात कर्तव्यावर होते.

सुट्टी निमित्त ते आपल्या मुळगावी आले होते. सुट्टी संपल्यानंतर ते उत्तराखंड येथे कर्तव्यावर जाण्यासाठी पुण्यात तिकीट बुक करण्याच्या निमित्ताने आले होते. त्या वेळी त्यांच्यावर काळाने घाला घातला. तर दत्ता काळे हे त्यांच्या नात्यातील आहेत. हनुमंत काळे आणि सहप्रवासी दत्ता काळे पुणे-सोलापूर रस्त्यावरून शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास जात होते. रेसकोर्स परिसरातील टर्फ क्लब चौकात महापालिकेच्या कचरा वाहतूक करणार्‍या ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिली.

ट्रकच्या धडकेने दुचाकी दुभाजकावर आदळली. दोघांना ट्रकने फरफटत नेले. अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच दोघांचा मृत्यू झाला. ट्रकचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिस उपनिरीक्षक शिवाजी बुनगे तपास करीत आहेत.

 

Back to top button