पिंपरी : डॉक्टर महिलेचा दोघांवर खुनी हल्ला | पुढारी

पिंपरी : डॉक्टर महिलेचा दोघांवर खुनी हल्ला

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  डॉक्टर महिलेने रुग्णालय आणि व्यायामशाळेमध्ये गोंधळ घालत दोघांवर खुनी हल्ला चढविला. या प्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल कऱण्यात आले आहेत. या घटना गुरुवारी (दि. 4) रात्री साडेआठ आणि नऊच्या सुमारास घडल्या.
पहिल्या घटनेत डॉ. राजीव अजित नगरकर (51, रा. यमुनानगर, निगडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, फिजिओथेरपिस्ट डॉक्टर महिला (29, रा. कोंढवा, पुणे. मूळ रा. भोपाळ, मध्यप्रदेश) हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नगरकर यांचा यमुनानगर येथे दवाखाना आहे. दरम्यान, गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास आरोपी महिलेने दवाखान्यात येऊन टेबलवरील काचेचा ग्लास, मोबाईल, लॅपटॉप, काचेच्या फ्रेमची तोडफोड केली. माझ्या पतीला फोन करा नाहीतर मी आत्महत्या करेन. तुम्ही पोलिसांना बोलावले तर मी आत्महत्या करेन, अशी धमकी देत महिलेने फिर्यादी यांच्या हाताला चावा घेतला. धमकी देत महिलेने फिर्यादी यांच्यवर काचेच्या तुकड्याने वार केला.

दुसर्‍या घटनेत एका महिलेने फिर्याद दिली आहे. आरोपी महिला आकुर्डी प्राधिकरण येथील एका व्यायाम शाळेत गेली. व्यायामशाळेत एक महिला आणि व्यायाम शाळेचे मालक साहित्याची आवराआवर करून घरी निघाले होते. त्यावेळी व्यायाम शाळेत येऊन आरोपी महिलेने, मी तुम्हांला ठार मारेन, अशी धमकी देत एका महिलेला व्यायामाचे साहित्य फेकून मारले. यामध्ये व्यायाम शाळेचे मालक मयुरेश केशव मोरे यांच्या हाताला मार लागला. तसेच, महिलेने हातातील काचेच्या तुकड्याचा धाक दाखवून दहशत निर्माण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. दोन्ही गुन्ह्याचा तपास निगडी पोलिस करीत आहे.

Back to top button