नारायणगाव येथे टेम्पो-ट्रकची धडक | पुढारी

नारायणगाव येथे टेम्पो-ट्रकची धडक

नारायणगाव : येथील कोल्हे मळा या ठिकाणी ओझर फाट्याच्या नजीक टाटा टेम्पो व टाटा ट्रक या दोन मालवाहू गाड्याची शनिवारी ६ ऑगस्टरोजी सायंकाळी पाचच्या सुमारास समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात टाटा टेम्पोचा चालक हा गंभीररित्या जखमी झाला. या धडकेमध्ये दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले असून जखमी टेम्पो चालकास खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. सागर नेहे (रा. ओतूर, ता. जुन्नर) असे हे अपघातात जखमी झालेल्या टेम्पो चालकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार टाटा टेम्पो (एमएच १६ एइ ८०४७) हा नारायणगावहून ओझरच्या दिशेला निघाला होता, तर टाटा ट्रक (एमएच ४२ एओ ९४७४) हा पूनम हॉटेलच्या दिशेने जाताना या दोन्ही मालवाहू गाड्यांची समोरासमोर धडक झाली. ही धडक एवढी जोरात होती की, त्याचा आवाज लांबपर्यंत गेला. धडकेच्या आवाजाने आजूबाजूचे नागरिक गोळा झाले. नागरिकांनी त्वरित स्टेरिंगमध्ये अडकलेल्या टेम्पो चालकाला मोठ्या शिताफीने काढून रुगणवाहिका बोलावून खासगी दवाखान्यात दाखल केले. या धडकेमुळे कोल्हे मळा रोडला सुमारे अर्धा तास वाहतुकीची कोंडी झाली होती. स्थानिक नागरिकांनी या गाड्यांना बाजूला करून वाहतुकीचा मार्ग मोकळा केला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरू केला आहे.

Back to top button