पिंपरी : आरक्षण सोडत यादी कामकाजास आयोगाकडून‘ब्रेक’ | पुढारी

पिंपरी : आरक्षण सोडत यादी कामकाजास आयोगाकडून‘ब्रेक’

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील सर्व महापालिकांच्या निवडणुकांसाठी सुरू असलेली प्रक्रिया रद्द करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेने निवडणुकीसंदर्भातील कामकाज थांबविले आहे. आरक्षण सोडतीची प्रभागनिहाय अंतिम यादी शुक्रवारी (दि.5) प्रसिद्ध करण्यात आली नाही. राज्यातील 23 महापालिका निवडणुकीसाठी जाहीर झालेली प्रभागरचना व आरक्षण सोडत राज्य निवडणूक आयोगाने रद्द केली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक लांबणीवर गेली आहे. निवडणुकीची प्रभागरचना व आरक्षण सोडत नव्याने काढण्यात येणार आहे, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी पालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांना गुरूवारी (दि.4) दिले आहेत.

तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने पालिका निवडणुकीसाठी तीन सदस्य प्रभागरचना केली होती. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न न्यायालयाच्या कचाट्यात अडकल्यानंतर ओबीसींना वगळून आरक्षण जाहीर करण्यात आले. राज्यात सत्तांतर होताच ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटला. त्यानंतर ओबीसींचा समावेश करून नव्याने सोडत काढण्यात आली.या सोडतीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाने दोन दिवसांपूर्वी मंत्रीमंडळ बैठकीत सन 2017 प्रमाणे प्रभागरचना व सदस्य संख्या करण्याचा निर्णय घेतला.

त्यामुळे निवडणूक आयोगाने प्रभागरचना, आरक्षण सोडत व मतदार याद्यांबाबत सुरु असलेली प्रक्रिया थांबविण्याचे आदेश दिले. आघाडी सरकारच्या निर्णयाप्रमाणे झालेली संपूर्ण प्रक्रिया रद्दबादल ठरण्याची शक्यता आहे. पुन्हा नव्याने संपूर्ण प्रक्रिया निवडणूक आयोग व महापालिका निवडणूक यंत्रणेला राबवावी लागू शकते.

आयोगाच्या आदेशानुसार निवडणुकीचे काम थांबविले
राज्य सरकारमार्फत प्रभागरचना व सदस्य संख्येबाबत अध्यादेश काढण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून देखील पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीबाबत सुरू असेलली प्रक्रिया थांबविण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार शुक्रवारी (दि.5) प्रसिद्ध करण्यात येणारी आरक्षण सोडतीची अंतिम यादी प्रसिध्द करण्याची प्रक्रिया थांबविण्यात आली आहे. निवडणूक आयोगामार्फत प्राप्त होणार्‍या निर्देशानुसार पुढील कार्यवाही केली जाईल, असे सहायक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांनी सांगितले.

Back to top button