पिंपरी : खड्डे शोधणारे पालिकेचे सॉफ्टवेअर खड्ड्यात! | पुढारी

पिंपरी : खड्डे शोधणारे पालिकेचे सॉफ्टवेअर खड्ड्यात!

पिंपरी : शहरातील रस्त्यांची पावसाने चाळण झाली आहे. शहरातील 90 टक्के खड्डे बुजवल्याचा महापालिका प्रशासनाचा दावा आहे. मात्र, हा दावा खोटा असल्याचे शहरात फेरफटका मारला असता दिसून आले. महापालिकेने काही वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून बनविलेले खड्ड्यांचा शोध घेणारे सॉफ्टवेअर गेले कुठे, असा प्रश्नही उपस्थित झाला आहे.

पिंपरी महापालिकेने तत्कालीन शहर अभियंता एकनाथ उगीले यांच्या कार्यकाळात खड्डे शोधणारे सॉफ्टवेअर विकसित केले . गाडीवर बसून कर्मचार्‍यांनी खड्डे शोधायचे, ते मोबाईल अ‍ॅप्लिकेशनमध्ये ,सिस्टीममध्ये टाकायचे,खड्डा संबंधित अधिकार्‍याने भरून घ्यायचा .खड्डे दुरुस्त केल्याचा फोटो अपलोड करायचा अशी ही एकूण कार्यपद्धती होती; मात्र मोबाईल अ‍ॅप्लिकेशन तांत्रिकदृष्ट्या प्रगत नसल्याचे सांगत पालिकेने त्याचा वापर थांबवला .

काही दिवसांपूर्वी शहरात मुसळधार पावसाने मोठमोठे खड्डे पडले होते. पावसाळ्यापूर्वी शहरात 265 खड्डे होते पावसाळा सुरू झाल्यावर 845 खड्डे नव्याने झाले .असे शहरात एकूण 1 हजार 110 खड्डे आढळून आले यापैकी 846 खड्डे बुजविल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे 238 खड्डे डांबराने बुजवले.53 खड्डे बीबीएम ने भरले.डब्लूएमएम ने 397,पेव्हिंग ब्लॉकने 32 ,मुरूम खडीने 126 खड्डे भरल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.मात्र शहरात भटकंती केली असता 90 टक्के खड्डे भरल्याचा दावा खोटा असल्याचे समोर आले आहे.

शहरात 1 हजार 110 खड्डे आढळून आले. त्यापैकी 90 टक्के खड्डे बुजवले आहेत.पालिकेने पूर्वी डॅश बोर्डचे काम करतानाच खड्डा शोधणारे सॉफ्टवेअर बनवले होते, ही वस्तुस्थिती आहे; मात्र मोबाईल अ‍ॅप्लिकेशन डेव्हलप नव्हते. तांत्रिकदृष्ट्या ते तितके प्रगत नसल्याने त्याचा वापर बंद केला आहे.
                          -मकरंद निकम, शहर अभियंता, पिंपरी चिंचवड महापालिका

विरोधक गप्प !
तत्कालीन विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादीचे दिवंगत नेते दत्तात्रय साने यांनी शहरातील खड्ड्यासह सेल्फी पाठवा 100 रुपये मिळवा, अशी योजना राबवून प्रशासनाचे लक्ष वेधले होते; मात्र आता महापालिका निवडणूक तोंडावर आली तरी शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नावर विरोधकांनी मौन बाळगले असल्याचे दिसत आहे.

Back to top button