मोशी बंधार्‍यात जलपर्णी अडकली, परिसरात दुर्गंधी | पुढारी

मोशी बंधार्‍यात जलपर्णी अडकली, परिसरात दुर्गंधी

मोशी : पुढारी वृत्तसेवा : नुकताच महिनाभर हजेरी लावून गेलेल्या पावसाने इंद्रायणी नदी ओसंडून वाहत होती. यात नदीतील जलपर्णी वाहुन पात्र रिकामे झाले होते. मात्र, काही जलपर्णी ही मोशी बंधार्‍यात अडकून पडल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
त्यामुळे जलपर्णी तातडीने हटवावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशी, शेतकर्‍यांनाकडून करण्यात आली होती. परंतु, याकडे पिंपरी-चिंचवड महापालिका दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.

मोशी बंधारा भागात अडकलेल्या जलपर्णीमुळे बंधारादेखील झाकला गेला असून, पाणी नसल्याने पात्र कोरडे पडले आहे. काळसर पाणी आणि जलपर्णी यामुळे याभागात डासांचा उपद्रवदेखील वाढत आहे. येत्या महिनाभरात जलसंपदा विभागाकडून शेतीसाठी आवर्तन सोडण्यात येईल. अशावेळी बंधार्‍यात असलेली जलपर्णी पुन्हा पाण्यातून वर येईल आणि शुद्ध पाणी खराब करेल. त्यामुळे तत्पूर्वी जलपर्णी काढली गेल्यास येणारे शुद्ध पाणी शेतकर्‍यांना शेतीसाठी वापरता येईल.

बंधार्‍यावर सुरक्षा कठडे बसविले जावेत, ही मागणीदेखील अनेक वर्षांपासून केली जात आहे. मात्र, याकडे महापालिका दुर्लक्ष करत असल्याचा फटका शाळेत जाणार्‍या विद्यार्थ्यांना बसत आहे. तसेच, त्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे.

Back to top button