'पुढारी ऑनलाईन'मुळे लहानग्यांना मिळाले तातडीने उपचार, वाचा साविस्तर | पुढारी

'पुढारी ऑनलाईन'मुळे लहानग्यांना मिळाले तातडीने उपचार, वाचा साविस्तर

राजगुरूनगर : पुढारी वृत्तसेवा : दै. ‘पुढारी’तून ऑनलाइन वृत्त प्रसिद्ध झाले आणि त्याची दखल घेत अवघ्या एक तासात आरोग्य अधिकारी गावात पोहोचल्याची घटना खेड तालुक्याच्या पांगरी गावातील ग्रामस्थांनी शनिवारी (दि. ६) अनुभवली. त्यामुळे शाळेचे शिक्षक, पालकांनी दै ‘पुढारी’चे ऋण व्यक्त केले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यातील विविध शाळेत लहान विद्यार्थ्यांना साथीचे आजार जडले आहेत. थंडी, ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, डोकेदुखी अशा आजारांनी विद्यार्थी, शिक्षक हैराण झाले आहेत.

आजारी असल्याने शाळेत अर्ध्याहून अधिक विद्यार्थी अनुपस्थित आहेत. पालकांना मुलांवर उपचार करून घेताना मनस्ताप आणि नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तालुक्यातील पांगरी या गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत ४१ विद्यार्थी आहेत. त्यातील १७ विद्यार्थी आजारी व तीन दवाखान्यात दाखल असल्याचे सविस्तर वृत्त दै ‘पुढारी’ने शनिवारी दुपारी १२ वाजता ऑनलाइन प्रसिद्ध केले.

सांडभोरवाडी -काळुस जिल्हा परिषद गटात हे गाव आहे. राजगुरूनगरपासुन पाच किलोमीटरवर हे गाव आहे. जवळ असलेल्या चांडोली ग्रामीण रुग्णालयात शिक्षक, पालकांनी सांगुनही तीन दिवस शाळेत कोणीही फिरकले नाही. यावर वृत्त प्रसिद्ध झाल्याचे समजताच या गटाचे माझी जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे यांनी संबंधित आरोग्य अधिकारी यांच्याकडे विचारणा केली व पांगरी गावात तातडीने उपचार सेवा उपलब्ध करुन देण्यात यावी, असा आग्रह धरला.

राजगुरूनगर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रमुख डॉ. पुनम चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाद्वारे पांगरी गावात दुपारी एक वाजता तातडीने आरोग्य शिबीर आयोजित केले. आजारी विद्यार्थी घरीच होते. तर शनिवारची सकाळी शाळा असल्याने इतर विद्यार्थी पण घरी होते. आरोग्य पथकाने पांगरी गावात घरोघर जाऊन विद्यार्थ्यांची तपासणी करून उपचार केले. बाबाजी काळे, सोसायटीचे माजी अध्यक्ष प्रकाश घोलप, शाळेचे शिक्षक संदीप जाधव व इतर यावेळी उपस्थित होते.

गेल्या महिन्यात सतत पाऊस पडला. त्यामुळे वातावरणात ओलावा आहे. चिखल, पाण्यामुळे शाळेत सर्दी, खोकल्याने अनेक विद्यार्थी आजारी आहेत. खासगी उपचार करून झाले. पण मुलांना शाळेत पाठवले की पुन्हा आजार जडतो. शिक्षक व आम्ही ग्रामीण रुग्णालयात शिबिर घ्यावे म्हणून सांगितले. पण दखल घेतली नाही. दै ‘पुढारी’च्या ऑनलाइन बातमीने मात्र आमच्या समस्येवर तातडीने तोडगा काढला.
                                                                                 -अरुण घोलप, पालक

Back to top button