नानगाव : चिखलामुळे वाहनांना अपघाताचा धोका | पुढारी

नानगाव : चिखलामुळे वाहनांना अपघाताचा धोका

नानगाव; पुढारी वृत्तसेवा: नानगाव -पारगाव सा. मा. (ता. दौंड) या अष्टविनायक मार्गावर शेतातून वाहनांच्या चाकाला लागून आलेला चिखल पडलेला दिसून येत आहे. या चिखलामुळे वाहनांना अपघातही होत आहेत. अष्टविनायक मार्गाचे काम झाल्यामुळे या रस्त्याचा कायमचा प्रश्न मार्गी लागला आहे. मात्र, या भागात रस्त्याच्या दोन्हीही बाजूला शेती आहे. त्यामुळे शेतातील कामासाठी ट्रँक्टर व इतर वाहने सतत ये-जा करत असतात. सध्या बर्‍याच ठिकाणी शेतामध्ये ऊसतोडणीची कामे सुरु आहेत. त्यामुळे शेतामधून ट्रेलरच्या सहाय्याने ऊस बाहेर रस्त्यावर काढण्यात येत आहे.

गेल्या दोन- तीन दिवसांपासून या भागात पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतात चिखल झाला आहे. जेव्हा ट्रॅक्टरच्या साहाय्याने ऊस बाहेर काढला जातो, तेव्हा ट्रॅक्टर व ट्रेलरच्या चाकाला मोठ्या प्रमाणावर चिखल लागलेला असतो. हाच चिखल रस्त्यावर अस्ताव्यस्त पसरत आहे. रस्ता चांगला असल्यामुळे वाहने जोरात धावत असतात. त्यामुळे चिखलावरुन वाहन घसरुन अपघात होण्याचा धोका वाढला आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी वाहनचालकांकडून होत आहे.

Back to top button