मुसळधार पावसाने दौंड जलमय | पुढारी

मुसळधार पावसाने दौंड जलमय

दौंड; पुढारी वृत्तसेवा: दौंड शहराला शुक्रवारी (दि. 5) मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले. संपूर्ण शहरच जलमय झाले, सर्व प्रमुख रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते. परिणामी शहरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. दौंड नगरपालिकेने अनेक ठिकाणी नालेसफाई न केल्याने फटका बसल्याचे नागरिक बोलत होते. दौंड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉक्टर भंगाळे हॉस्पिटल, कुरकुंभ मोरी, भाजी मंडई परिसर, गांधी चौक या ठिकाणी प्रचंड पाणी साचले होते.

शिवाजी चौकात पाण्याचा निचरा न झाल्याने वाहनेही पाण्यात गेली होती. मात्र सूस्त पडलेल्या नगरपालिकेला याबाबत काही घेणे-देणे नाही, हे स्पष्ट झाले. या भागातून पाण्याचा निचरा होत नसल्याची बाब अनेकदा नगरपालिका प्रशासन व पुढा-यांच्या निदर्शनास आणून दिली होती. परंतु त्यांनी ठोस उपाययोजना काही केली नाही. परिणामी मोठा पाऊस पडल्यावर शहरात शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागला.

घाण पाण्यातून वाहने ढकलत बाहेर काढली
दीड तास या पावसाने झोडपल्याने नेहमीप्रमाणे कुरकुंभ मोरी तुडुंब झाली होती. सायंकाळी शाळा सुटण्याची वेळ असल्याने विद्यार्थ्यांना व नागरिकांना या पाण्यातून वाट काढत जावे लागले. अनेक जणांची वाहने बंद पडली, त्यामुळे या पाण्यातूनच ही वाहने त्यांना ढकलत बाहेर काढावी लागली. बंगाळे हॉस्पिटल, स्टेट बँक एरिया या भागातील दुकानात पावसाचे पाणी गेले. भीमनगर येथे काही घरांत या पावसाचे पाणी शिरले.

जाणून-बुजून दुर्लक्ष केल्याचा आरोप
दौंड शहरातून जाणारा अष्टविनायक महामार्ग बनवताना जबाबदार अधिकार्‍यांनी व पुढार्‍यांनी याकडे जाणून-बुजून दुर्लक्ष केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पाण्याचा निचरा होणार नाही हे लक्षात आणून देऊनही या भागातील कामे केली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

Back to top button