पिंपरीत दोन गटांत हाणामारी, मिरवणुकीत नाचताना झालेल्या भांडणाचा राग | पुढारी

पिंपरीत दोन गटांत हाणामारी, मिरवणुकीत नाचताना झालेल्या भांडणाचा राग

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : मिरवणुकीत नाचताना झालेल्या भांडणाचा राग मनात धारून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. ही घटना सोमवारी (दि. 1) रात्री बौद्धनगर, पिंपरी येथे घडली. ऋषिकेश सचिन जमदाडे (19, रा. पिंपरी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सिद्धार्थ वाघमारे, आशिष पाल, रितेश किर्ते यासह अन्य चार अनोळखी इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे मित्र आरोपी रितेशच्या घरी गेले होते.

त्यावरुन आरोपीने ”तू माझ्या घरी मुले घेऊन का गेला होतास, असे म्हणून फिर्यादी यांना कोयत्याने मारहाण केली. तसेच, अन्य आरोपींनी त्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली. याच्या परस्पर विरोधात रितेश प्रभाकर किर्ते (18, रा. पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ऋषिकेश जमदाडे, अविनाश प्रकाश माने, अक्षय केशव आम्ले आणि त्यांचे तीन अनोळखी साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी यांची एका मिरवणुकीत भांडणे झाली होती. त्याचा राग मनात धरून आरोपी आपल्याला मारण्यासाठी घरी गेल्याचे फिर्यादी यांना समजले. त्यामुळे याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी गेले असता आरोपींनी त्यांना कोयत्याच्या मुठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच, आरोपींनी फिर्यादी मित्राच्या गाडीवर कोयत्याने, दगडाने मारून नुकसान केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

Back to top button