सांगवी परिसराला जोरदार पावसाने झोडपले | पुढारी

सांगवी परिसराला जोरदार पावसाने झोडपले

सांगवी; पुढारी वृत्तसेवा: सांगवी (ता. बारामती) परिसराला गुरुवारी (दि.4) जोरदार पावसाने झोडपून काढले. यंदाच्या पावसाळ्यातील हा पहिलाच मोठा पाऊस आहे. सांगवी ग्रामपंचायतीच्या पर्जन्यमापक यंत्रावर 55 मिलिमीटर नोंद झाली आहे. सांगवी परिसरात 1 जून रोजी 33 मिलिमीटर पाऊस झाला होता. त्यानंतर वारंवार पाऊस हुलकावणी देत होता. आकाशात काळ्याकुट्ट ढगांची दाटी होत होती.

मात्र, हलक्या सरींव्यतिरिक्त मोठा पाऊस पडत नव्हता. गुरुवारी सायंकाळी जोरदार पावसाला सुरुवात झाली. शुक्रवारी सकाळी सांगवी ग्रामपंचायतीच्या पर्जन्यमापक यंत्रावर 55 मिलिमीटर पावसाची नोंद आढळली. सांगवी परिसरातील लाटे, माळवाडी, शिरष्णे, कांबळेश्वर, शिरवली, खांडज या भागातील शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. नवीन उसाच्या लागवडीतील साचलेले पाणी काढून देण्यासाठी शेतकर्‍यांची लगबग सुरू होती.

सलग दुसर्‍या दिवशी पाऊस
गुरुवारी सायंकाळी सुरू झालेल्या पावसाने शुक्रवारी दुपारपर्यंत उसंत घेतली होती. मात्र, दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. परिणामी सांगवीच्या आठवडे बाजारातील विक्रेत्यांची मोठ्या प्रमाणात तारांबळ उडाली.

Back to top button