यमुनानगर रुग्णालयावर पडतोय रुग्णसेवेचा अतिरिक्त ताण | पुढारी

यमुनानगर रुग्णालयावर पडतोय रुग्णसेवेचा अतिरिक्त ताण

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या यमुनानगर येथील रुग्णालयावर सध्या रुग्णसेवेचा अतिरिक्त ताण पडतो आहे. येथील रुग्णालयात दररोज 150 ते 200 रुग्ण बाह्यरुग्ण विभागात तपासणीसाठी येत असतात. रुग्णालयामध्ये प्रसूती व कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेची सोय आहे. मात्र, अन्य शस्त्रक्रियांची सुविधा नाही. तसेच, रुग्णालयाचे क्षेत्र ‘रेडझोन’ हद्दीत येत असल्याने जागा उपलब्ध असतानाही बांधकाम करता येत नाही, अशी परिस्थिती आहे.

यमुनानगर येथील रुग्णालयात तळवडे, रुपीनगर, म्हेत्रेवस्ती, देहूगाव, मोई आदी भागांतून रुग्ण उपचारासाठी येत असतात. रुग्णालयात 20 खाटांची सोय होणार आहे. रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात गर्भवती महिला, बालक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या तपासणीची सोय उपलब्ध आहे.

रुग्णालयातील आंतररुग्ण विभागात प्रसूती, कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया, कॉपर टी बसविणे आदींसाठी महिलांना दाखल करुन घेतले जाते. येथे दररोज एकूण 4 ते 5 प्रसूती व कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया होतात.

कोणत्या सुविधांचा अभाव
रुग्णालयात विविध आजारांसाठी आंतररुग्ण विभागाची सोय नाही.
महिलांची प्रसूती, कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया वगळता अन्य शस्त्रक्रिया होत नाही.
अपघातग्रस्त रुग्णांवर केवळ प्राथमिक उपचार
पुढील उपचारासाठी अन्य रुग्णालयात पाठवावे लागते.

 

रुग्णालयातील महिला प्रसूतीगृहात उपचार करण्याची सुविधा कशी वाढविता येईल, त्या दृष्टीने आमचा भर असणार आहे. त्याशिवाय, रुग्णालयात लवकरच सोनोग्राफी मशीन घेण्यात येणार आहे. तसेच, ‘सीएसआर’च्या माध्यमातून फॅब्रिकेशनमध्ये ओपीडी कॉम्प्लेक्स उभारणार आहे. तसेच, अल्ट्रा सोनोग्राफी व दंतोपचार प्रस्तावित आहेत.
               – डॉ. राजेंद्र फिरके, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी, यमुनानगर रुग्णालय

रुग्णालयात आज सकाळी माझ्या मुलीला प्रसूतीसाठी दाखल केले. तिच्यावर सध्या चांगले उपचार होत आहेत. तिला आवश्यक औषधे रुग्णालयातून मिळाली आहेत.
                                                 – सुखीदेवी चौधरी, रुग्णाच्या नातेवाईक.

Back to top button