पुणे : दिव्यांगांसाठी विशेष मोहीम; 15पर्यंत जिल्ह्यात उपक्रम | पुढारी

पुणे : दिव्यांगांसाठी विशेष मोहीम; 15पर्यंत जिल्ह्यात उपक्रम

पुणे; पुढारी वृत्तसेवा: दिव्यांग व्यक्तींना विविध माध्यमांतून लाभ दिला जातो. या लाभापासून या व्यक्ती वंचित राहू नयेत आणि त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील ‘आशा’ कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ही शोध मोहीम घेतली जाणार आहे. जिल्ह्यात ही शोध मोहीम येत्या पंधरा ऑगस्टपर्यंत राबविण्यात येणार आहे. प्रत्येक घरास भेट देऊन कुटुंबातील सर्व सदस्यांची तपासणी केली जाईल. त्यांच्यापैकी दिव्यांग व्यक्तींचा शोध घेण्यात येईल. ज्या सदस्यांची दिव्यांग म्हणून पूर्वी नोंद झाली आहे त्यांच्याकडे दिव्यांगांबाबतची कागदपत्रे, प्रमाणपत्रांची नोंद स्वतंत्ररीत्या केली जाईल.

जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग, समाजकल्याण विभागामार्फत ही शोधमोहीम घेतली जाणार आहे. ‘आशा’ स्वयंसेविकांमार्फत दिव्यांगांचा शोध घेऊन त्यांची माहिती अद्ययावत करण्यासाठी पुणे जिल्हा परिषद स्वनिधीअंतर्गत 2022- 23 या आर्थिक वर्षात मोहीम राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

ग्रामीण तसेच दुर्गम भागातील दिव्यांग व्यक्ती योग्य प्रमाणपत्रे किंवा कागपत्रांअभावी विविध लाभांपासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा सर्व वंचित दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणणे, त्यांना मिळणार्‍या लाभाची माहिती देणे तसेच त्यांचे जीवनमान उंचावणे हा दिव्यांगांच्या शोध मोहिमेचा उद्देश आहे. जिल्ह्यात सध्या दोन हजार 858 ‘आशा’ स्वयंसेविका कार्यरत आहेत.

असा होईल उपयोग…
दिव्यांगांचे जीवनमान उंचावण्यास, सक्षमीकरण करण्यास मदत होईल
शोध मोहिमेतील दिव्यांगांना प्रमाणपत्र उपलब्ध करून दिली जातील
सरकारी सुविधांचाही लाभ मिळवून देता येईल
प्रतिदिव्यांगामागे ‘आशा’ स्वयंसेविकेला पाचशे रुपये मोबदला

Back to top button