मांजरी : रेल्वे उड्डाणपुलासाठी तारीख पे तारीख | पुढारी

मांजरी : रेल्वे उड्डाणपुलासाठी तारीख पे तारीख

मांजरी; पुढारी वृत्तसेवा: रेल्वे उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आलेले असतानाच गेल्या काही महिन्यांपासून कामाची गती मात्र मंदावलेली आहे. रेल्वे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनाच कामाच्या पूर्ततेचा अंदाज नसल्याने प्रत्येकवेळी त्यांच्याकडून तारीख पे तारीख दिली जात आहे. त्यामुळे पूर्ततेच्या टप्प्यात दिसत असलेला हा उड्डाणपूल नेमका कधी पूर्ण होईल, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. पाच वर्षांपूर्वी मांजरी बुद्रुक येथील या रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू झाले आहे. मुदतवाढ मिळूनही ते अद्याप पूर्ण झालेले नाही.

सध्या लोहमार्गावरील भाग वगळता पुलाच्या दोन्हीही बाजूचे काम पंच्याण्ण्व टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे. रेल्वे बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील काम मात्र ठप्प आहे. या कामाचा मागोवा घेताना गेली वर्षभरापासून रेल्वे व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांकडून हे काम महिनाअखेरीस किंवा पुढच्या महिन्यात, अमूक तारखेला पूर्ण होणार असल्याचे सांगितले जात आहे, अशी आश्वासने देत वर्ष उलटून गेले आहे, तरीही काम पूर्ण होत नाही. पुलाच्या दोन्ही बाजूकडील भराव, सेवा रस्ते तसेच लोहमार्गावरील ओव्हरहेडचे मुख्य काम रेंगाळत सुरू आहे. या कामाला गती दिसत नाही.

गेली दोन वर्षे कोरोनामुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थी, पालकांना उड्डाणपुलाच्या कामाचा त्रास फारसा जाणवला नाही. मात्र, सध्या शाळा सुरू झाल्याने येथील अव्यवस्था प्रकर्षाने जाणवत आहे. पावसाने सेवा रस्त्याची दैना उघडी पडली आहे. प्रवास नेमका कुठून करावा, असा प्रश्न पडत आहे. मुलांना सोडताना व पुन्हा आणायला येताना ही कसरत करावी लागत आहे. पुलाचे काम तर रेंगाळत सुरू आहेच, परंतु सेवा रस्त्याच्या सुरक्षिततेकडेही प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार पालक व स्थानिक रहिवासी रोहिदास धारवाडकर, विशाल पर्‍हाड, सुहास राहिंस, धनराज घुले, नीलम घुले, करुणा मेश्राम यांनी केली आहे.

पुलाचे काम पूर्ण न झाल्याने तसेच सेवा रस्ते सुरक्षित नसल्याने स्थानिक नागरिक व प्रवाशांसह शालेय विद्यार्थी व त्यांच्या पालकांची मोठी परवड होत आहे. सेवा रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडून त्यामध्ये पावसाचे पाणी साठले आहे. उर्वरित भागात चिखलाचे साम्राज्य आहे. त्यातून जीव मुठीत घेऊन, कसरत करीत, अक्षरशः उड्या मारीत मार्ग काढावा लागत आहे. या ठिकाणी भुयारी मार्गाचे काम होऊन महिना होत आला आहे. मात्र, तो अद्याप सुरू झालेला नाही. विद्यार्थ्यांसह नागरिक धोकादायकपणे लोहमार्ग ओलांडत आहेत. हा भूयारी मार्ग केवळ पादचार्‍यांच्या वापरासाठी असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. तो पादचार्‍यांबरोबरच दुचाकीसाठीही लवकरात लवकर सुरू करावा.

                                                        – अशोक आव्हाळे, स्थानिक ग्रामस्थ.

पुलाचे दोन्हीही बाजूकडील स्लॅबचे काम पूर्ण झाले आहे. उतारावरील भरावाचे कामही झाले आहे. ओहरहेडचे काम रेल्वेच्या बांधकाम विभागाकडून करण्यात येणार आहे. ते झाल्यावर पुलावरून वाहतूक सुरू होईल.
                                            – हेमंत चौगुले, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम.

रेल्वेने हे केले पाहिजे….
भुयारी मार्ग तातडीने सुरू करण्याची गरज, सेवारस्ते वाहतुकीस योग्य व्हावेत, पुलाखालील राडारोडा काढला जावा, बसचालक व पालकांनी विद्यार्थ्यांना लोहमार्ग सुरक्षितपणे ओलांडण्यास मदत करावी.

Back to top button