पुणे : स्वाईन फ्लूचे रुग्ण दोन दिवसांत दुप्पट | पुढारी

पुणे : स्वाईन फ्लूचे रुग्ण दोन दिवसांत दुप्पट

पुणे : शहरात 1 जानेवारी ते 15 जुलै या कालावधीत स्वाईन फ्लूचे केवळ 30 ते 40 रुग्ण आढळले होते. मात्र, गेल्या दोन दिवसांत स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या जवळपास दुप्पट झाली आहे. 3 ऑगस्ट रोजी पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 143 इतकी होती, तर 5 ऑगस्टपर्यंत 260 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विषाणूजन्य आजारांचा विळखा अधिकाधिक घट्ट होत चालला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होतोय, असे वाटत असतानाच आता पुन्हा स्वाईन फ्लूने डोके वर काढायला सुरुवात केली आहे.

सध्याच्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये अगदी 5 वर्षांच्या लहान मुलापासून वृध्दांपर्यंतचा समावेश आहे. स्वाईन फ्लूच्या रुग्णांमधील लक्षणे तीव्र स्वरूपाची असल्याचे पाहायला मिळत आहे. पुण्यात 2009 मध्ये स्वाईन फ्लूने डोके वर काढायला सुरुवात केली. जून महिन्यात स्वाईन फ्लूच्या पहिल्या रुग्णाचे निदान झाले. 3 ऑगस्ट रोजी रिदा शेख या 14 वर्षीय शाळकरी मुलीचा स्वाईन फ्लूने पुण्यातील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. स्वाईन फ्लूने झालेला हा देशातील सर्वांत पहिला मृत्यू असल्याने संपूर्ण देशाचे लक्ष पुण्यावर खिळले होते.

संशयित रुग्णांची कसून तपासणी, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, निदानासाठी आवश्यक सुविधा निर्माण करणे, उपचार यावर आरोग्य यंत्रणेकडून भर देण्यात आला. पुण्यात जानेवारी-फेब्रुवारी 2020 मध्ये स्वाईन फ्लूच्या 9 रुग्णांचे निदान झाले होते. मार्चमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर दीड वर्षामध्ये शहरात स्वाईन फ्लूचा एकही रुग्ण सापडला नाही. आता कोरोना नियंत्रणात आलेला असताना स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे.

सध्या स्वाईन फ्लू शहरात झपाट्याने वाढताना दिसत आहे. विशेषत: ज्येष्ठ नागरिक, रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या व्यक्ती, सहव्याधी असलेले रुग्ण यांच्यामध्ये स्वाईन फ्लूची तीव— स्वरूपाची लक्षणे पाहायला मिळत आहेत.

                           – डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका

चाचणी : 7173
नमुने पाठविले : 3541
संशयित : 377
पॉझिटिव्ह : 260
घरी सोडलेले : 85
रुग्णालयात दाखल : 165
व्हेंटिलेटरवर : 14
मृत्यू : 3

 

Back to top button