पुणे : ब्रेस्ट पंप निर्जंतुकीकरण कराच! स्त्रीरोगतज्ज्ञांचा मातांना सल्ला | पुढारी

पुणे : ब्रेस्ट पंप निर्जंतुकीकरण कराच! स्त्रीरोगतज्ज्ञांचा मातांना सल्ला

पुणे; पुढारी वृत्तसेवा: मॅन्युअल ब्रेस्ट पंप तसेच स्टोअरेज बॅगचा वापर करत असाल तर या वस्तूंचे निर्जंतुकीकरण करण्याचा सल्ला स्त्रीरोगतज्ज्ञांनी दिला आहे. बाळाला पावडरचे किंवा वरचे कोणतेही दूध देण्याऐवजी आईचे दूध फ्रिजमध्ये काढून ठेवून भूक लागल्यावर देता येऊ शकते. त्यासाठी मॅन्युअल ब्रेस्ट पंप उपयुक्त ठरतात. दूध साठवून ठेवण्यासाठी विशिष्ट स्टोअरेज बॅगही उपलब्ध आहेत. मात्र, या वस्तूंचे निर्जंतुकीकरण कटाक्षाने करून घ्यावे, असे मत या तज्ज्ञांनी व्यक्त केले.

नवजात बाळाला पहिले सहा महिने फक्त स्तनपान करावे, असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. बाळाच्या शारीरिक आणि मानसिक वाढीसाठी, रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी, संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी आईचे दूध उपयुक्त मानले जाते. बरेचदा, मुलांना वर्ष-दीड वर्षापर्यंत स्तनपान केले जाते. मात्र, नोकरदार महिलांना स्तनपानाशी तडजोड करावी लागते. अशा वेळी बाजारात उपलब्ध असलेल्या मॅन्युअल, बॅटरी ऑपरेटर आणि इलेक्ट्रिक अशा प्रकारच्या ब्रेस्ट पंपचा वापर करता येतो.

मात्र, स्वच्छता, दुधाची योग्य साठवणूक यावर बारकाईने लक्ष ठेवावे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. काही कारणाने बाळाला स्तनपान करता येत नसेल तर आईला ‘गिल्ट’ येतो. प्रसूतीनंतर काही शस्त्रक्रिया करावी लागल्यास, रुग्णालयात दाखल करावे लागल्यास स्तनपान शक्य होत नाही. अशा वेळी ब्रेस्ट पंपचा वापर करून आईचे दूध बाळाला देता येऊ शकते. दूध काढल्यापासून फ्रीजमध्ये ठेवल्यास सहा-सात तासांनी आणि फ्रीजबाहेर ठेवल्यास तीन-चार तासांमध्ये दूध बाळाला द्यावे, असा सल्ला डॉक्टरांना दिला आहे.

कधी देता येईल ठेवलेले दूध?
आजारी असणे, मानसिक थकवा, गंभीर आजारामुळे आई रुग्णालयात असल्यास
नोकरीमुळे जास्त काळ घराबाहेर रहावे लागणे
अपुर्‍या दिवसांचे बाळ असल्यास
बाळ अतिदक्षता विभागात असल्यास

स्वच्छता कशी राखावी ?
उपकरणाची दिवसातून एकदा पूर्ण स्वच्छता करावी.
बॅटरी ऑपरेटेड किंवा इलेक्ट्रिक पंप स्टीमने किंवा स्वच्छ कापडाने पुसून घेता येतील.
उपकरण ठेवण्याची जागाही स्वच्छ आणि कोरडी असावी.
पंपने दूध काढण्यापूर्वी स्तनांची स्वच्छता राखावी.

बाळाला शिळे दूध दिल्यास संसर्ग होऊन पोट बिघडणे, पोट दुखणे, उलट्या आणि जुलाब होणे असे त्रास होऊ शकतात. ब्रेस्ट पंपमधून दूध बाटलीत भरल्यावर वेळ आणि तारीख लिहून ठेवावी.
                                                             – डॉ. कल्पना कुलकर्णी, स्त्रीरोगतज्ज्ञ

Back to top button