पुणे : समाविष्ट गावांतील शिक्षकांची बदली शक्य: मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांची माहिती | पुढारी

पुणे : समाविष्ट गावांतील शिक्षकांची बदली शक्य: मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांची माहिती

पुणे; पुढारी वृत्तसेवा: आंतरजिल्हा बदली प्रक्रियेसाठी समाविष्ट गावातील शिक्षक पात्र असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत दिली. महापालिकेत समाविष्ट गावांमधील शिक्षक हे महापालिकेत की जिल्हा परिषदेत, याबाबत न्यायालयात अकरा याचिका दाखल झाल्या आहेत. या शिक्षकांची इच्छा असेल आणि ते पात्र असतील तर त्यांची बदली होऊ शकते, असे ते म्हणाले. पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या 23 गावांमधील शाळांमध्ये 538 शिक्षक कार्यरत आहेत.

त्यांना जिल्हा परिषदेच्या सेवेत राहता येणार असल्याचे जिल्हा परिषदेकडून वारंवार सांगण्यात आले आहे. प्रसाद म्हणाले, ‘ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढत आहे. जिल्हा परिषदेचे हे सर्व शिक्षक अनुभवी आहेत. प्रशिक्षित आहेत. त्यांना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची ओळख आहे. त्यांना महापालिकेच्या सेवेत पाठवणे उचित ठरणार नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी नेहमीच प्रयत्न असेल. महापालिका समाविष्ट गावातील शिक्षक हे जिल्हा परिषदेच्या बदलीसाठी पात्र आहेत.

या क्षेत्रातील शिक्षकांना त्यांच्या सोयीनुसार बदली करण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे या गावांतील शिक्षकांनी बदलीसाठी विनंती अर्ज करावेत.’ दरम्यान, जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीसाठी शनिवार (दि.6) पासून अर्जप्रक्रिया सुरू होत आहे. पुण्यासह राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली ऑनलाइन पद्धतीने करण्यात येत आहेत. या आंतरजिल्हा बदल्यांचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. पात्र, प्राथमिक शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीसाठी 6 ते 9 ऑगस्ट या चार दिवसांत अर्ज करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 13 ऑगस्ट रोजी प्राथमिक शिक्षकांचे आंतरजिल्हा बदलीचे आदेश काढण्यात येणार आहेत.

समायोजन जिल्हा परिषदेत…
जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमधील शिक्षकांची बदली प्रक्रियेत समावेश असेल. परंतु, 11 जणांनी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे या शिक्षकांनी जिल्हा परिषदेच्या बदली प्रक्रियेत सहभागी व्हावे का, असा प्रश्न पडला आहे. मात्र, त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी तत्कालीन पालिका आयुक्तांशी झालेल्या चर्चेनुसार व शिक्षक हक्क कायद्याप्रमाणे समाविष्ट गावांतील शिक्षक हे जिल्हा परिषदेत समायोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.

Back to top button