बारामती : अशा बाजार समित्या मग निवडणुका कशा घेणार? अजित पवार यांचा बारामतीत सवाल | पुढारी

बारामती : अशा बाजार समित्या मग निवडणुका कशा घेणार? अजित पवार यांचा बारामतीत सवाल

बारामती : पुढारी वृत्तसेवा: ‘फी’ भरणेही शक्य नसलेल्या आणि पगार करण्याची क्षमता नसलेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्या निवडणुका कशा घेणार,’ असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. बारामती तालुक्यात सायंबाचीवाडी येथे शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकर्‍यांना मतदानाचा हक्क राज्य शासनाने दिला आहे. पण, राज्यातील अनेक बाजार समित्यांची फी भरण्याचीही ऐपत नाही. 60 ते 65 टक्के समित्यांना कर्मचार्‍यांचे पगार देताना ओढाताण होत आहे. अशा स्थितीत त्या निवडणूक खर्च कसा भागवणार ? असा प्रश्न उपस्थित करीत यासंबंधी अधिवेशनात बोलणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

जनतेतून सरपंच व नगराध्यक्ष करताय तर राज्याचा मुख्यमंत्री, देशाचे पंतप्रधानही थेट जनतेतून निवडा, असा खोचक टोला पवार यांनी लगावला. पवार म्हणाले, ‘कोणीही व्यक्ती जेव्हा पदावर असते तेव्हा नियम मोडून चालत नाही.’ मुख्यमंत्री फिरत असताना रात्री दोनपर्यंत स्पिकर सुरू असल्याचे दिसते. आदेश देणारेच नियम मोडत असतील तर पोलिस तरी काय करणार ? प्रत्येकाला आपला पक्ष- गट वाढवण्याचा अधिकार आहे. मात्र, संविधानाने सांगितलेल्या अधिकाराप्रमाणे त्याचे पालन केले पाहिजे. नवीन सरकार आमच्या काळातील जनहिताच्या कामांनाही स्थगिती देत असून, हे चुकीचे असल्याचे पवार यांनी सांगितले.

…त्यांचे चेहरे पडलेत
सर्वोच्च न्यायालयात निकाल काय लागेल माहीत नसल्याने मंत्रिमंडळ विस्तार होत नाही की काय, अशी शंका येते. बंड केलेल्या आमदारांनाही तुम्हाला मंत्री करतो, असे सांगितले असावे, म्हणूनही विस्तार होत नसेल. त्यामुळे कोणाला मंत्री करायचे, हा प्रश्न आहे. भाजपच्याही 106 आमदारांना वाटते की, आपल्यालाही मंत्रिपद मिळायला पाहिजे. एकतर त्यांना मुख्यमंत्रिपद नसल्यामुळे त्यांच्या आमदारांचे चेहरे इतके पडले, की न सांगितलेले बरे अशी मिस्कील टिप्पणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

Back to top button