जेजुरी : कडेपठार मंदिरावर कलशारोहण | पुढारी

जेजुरी : कडेपठार मंदिरावर कलशारोहण

जेजुरी, पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक राज्यांतील लाखो भाविकांचे कुलदैवत असणार्‍या जेजुरी येथील जुनागड कडेपठारावरील श्री खंडोबादेवाच्या मंदिरावरील शिखराचे नूतनीकरण करण्यात आले. तसेच शिखरावर बुधवारी (दि. 3) धार्मिक विधीसह कलशारोहण करण्यात आले. जेजुरीचा खंडोबा हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. जेजुरीपासून सुमारे दीड ते दोन किलोमीटर कडेपठाराच्या डोंगरावर प्राचीन काळात श्री खंडोबादेवाचे भव्य मंदिर बांधले होते. वेळोवेळी या मंदिराचा जीर्णोधार ग्रामस्थ व भाविकांनी केला आहे.

मंदिरावरील शिखर जीर्ण झाल्याने सेवानिवृत्त सहधर्मादाय आयुक्त दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व उद्योजक, जेजुरी देवसंस्थानचे विश्वस्त राजकुमार लोढा परिवाराच्या वतीने शिखराच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले. राजस्थानमधून दगड आणून तो घडवून या शिखराचे काम करण्यात आले.

बसविणार्‍या कलशाचे पूजन मंगळवारी दि. 2 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर जेजुरी शहरातून कलशाची मिरवणूक काढून हा कलश पालखीत ठेवून कडेपठार गडावर आणला. बुधवारी कडेपठारावरील खंडोबा मंदिरात पूजा, अभिषेक, होमहवन आदी धार्मिक विधी करून गुरुवर्य एकनाथ तेजानाथ वैरागी महाराज यांच्या हस्ते कलशारोहण करण्यात आले. या वेळी श्री खंडोबा देवतालिंग कडेपठार ट्रस्टचे विश्वस्त चिंतामणी सातभाई, म्हाळसाकांत आगलावे आदींसह पुजारी, सेवकवर्ग, मानकरी, नित्य सेवेकरी, ग्रामस्थ व भाविक उपस्थित होते. वेदमूर्ती शशिकांत सेवेकरी यांनी या धार्मिक विधीचे पौरोहित्य केले.

Back to top button