पाटस: विजयवाडी तलाव ऐन पावसाळ्यात कोरडा | पुढारी

पाटस: विजयवाडी तलाव ऐन पावसाळ्यात कोरडा

पाटस, पुढारी वृत्तसेवा: ऐन पावसाळ्यात कुसेगाव (ता. दौंड) येथील विजयवाडी तलाव कोरडा पडलेला आहे. परिसरातील या तलावावर अवलंबून असणारे ओढेही कोरडे पडले आहेत. यातून शेतकर्‍यांवर पाणी संकट जाणवत असल्याने शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. विजयवाडी तलाव हा पूर्णपणे नैसर्गिक पाण्यावर अवलंबून आहे. मोठा पाऊस झाल्यावर डोंगरातील पाणी तलावात येऊन तलाव पूर्ण क्षमतेने भरला की, या तलावातील पाणी निर्माण होणार्‍या ओढ्याला जाते. ओढ्यावरील बंधारेही भरण्यास मदत होते. पण अद्यापही कुसेगाव परिसराला मोठा पाऊस न झाल्याने तलाव कोरडा ठाक पडलेला आहे. भागातील शेतीला पाणी कमी मिळत आहे. काहींच्या पीक लागवडी थांबल्या आहेत. परिणामी या भागातील शेतकरी मोठ्या पावसाची वाट पाहत आहे.

तलाव कोरडा असल्याने यातील मासेमारी संपुष्टात आली आहे. दरवर्षी पावसाळ्यात काही प्रमाणात तलाव भरला जातो, त्यातून मासे निर्माण होतात. तलाव कोरडा पडला की पुन्हा मासे नष्ट होत असल्याने या तलावातील मासेमारी संपुष्टात आली आहे. तलाव परिसरात जवळच वनविभाग असल्याने येथील चिंकारा हरण, मोर, लांडगे, कोल्हे पाणी पिण्यासाठी येथे वावरत असतात. पण तलाव कोरडा पडल्याने ते या परिसरात वावरतांना दिसत नाहीत. पावसाळ्यात भरलेल्या या तलावाचे पाणी सहा ते आठ महिने उपयोगी होते. परिणामी शेतकरी व ग्रामस्थ वर्गाला याचा फायदा होतो. तलाव भरण्यासाठी परिसरात शेतकरीवर्ग मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

Back to top button