शिवण्यात तहसीलदारांची वाळू माफियांवर धडक कारवाई ; घटनास्थळावरील ट्रॅक्टर आणि जेसीबी जप्त | पुढारी

शिवण्यात तहसीलदारांची वाळू माफियांवर धडक कारवाई ; घटनास्थळावरील ट्रॅक्टर आणि जेसीबी जप्त

वारजे : पुढारी वृत्तसेवा : शिवणे येथे भर पावसात मुठा नदी पात्रात अवैध वाळू उपशासाठी गेलेल्या वाळू माफियांवर तहसीलदार तृप्ती कोलते – पाटील यांनी दि. 4 ऑगस्ट रोजी राञीच्या सुमारास शिवणे मुठा नदी पात्रात धाड टाकत धडक कारवाई केली असून या कारवाई मुळे वाळू  माफियांचे धाबे दणाणले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की दि. 4 ऑगस्ट रोजी राञी साडे नऊ वाजेच्या सुमारास शिवणे येथे मुठा नदी पात्रात बेकायदा वाळू उपशासाठी वाहने गेली असल्याची माहीती काही नागरीकांकडून प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार मुठा नदी पात्रात बेकायदा वाळू उपसा करण्यासाठी गेलेल्या जेसीबी वाहनांना सिनेस्टाईलने स्वतःची मोटार आडवी घालून जेसीबी वाहने रोखण्याची कामगिरी तहसीलदार तृप्ती कोलते यांनी केली आहे. या दरम्यान पाऊस तसेच अंधाराचा फायदा घेत वाळू माफियांनी त्यांची वाहने ट्रॅक्टर व जेसीबी मशीन सोडून पलायन केले. मात्र या कारवाईत त्यांचे ट्रॅक्टर व जेसीबी मशीन जप्त करण्यात महसूल व पोलीस विभागाला यश आले आहे.

मुठा नदी पात्रात बेकायदा वाळू उपसा सुरू असल्यासंदर्भात यापुर्वी दैनिक पुढारीमध्ये सविस्तर वृत्त देखील प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यावेळी या मुठा नदी पात्रातील बेकायदा वाळूचा उपसा रोखण्यासाठी पावले उचलली जात होती मात्र महसुल विभागाला व पोलीसांना वाळु माफीयांना पकडण्यात यश येत नव्हते.

दरम्यान शुक्रवारी रात्रीच्या वेळी माहीती मिळताच तहसीलदार तृप्ती कोलते – पाटील यांनी वारजे पोलीसांना कळवीत शिवणे नांदेड पुलाजवळ समोरून येणाऱ्या गाड्यांना रोखत कारवाई केली. जेसीबी मशीन व ट्रॅक्टर जोडलेली चाळणी जप्त केली आहे. या प्रकरणी मंडल अधिकारी  प्रमोद भांड यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जवळगी करीत आहेत.

नदी पात्रामध्ये आम्ही जाईपर्यंत हे वाळू तस्कर मशीनसह पसार होतात. काही दक्ष नागरीकांकडून वेळेत माहीती मिळाल्याने कारवाई करता आली. मात्र अंधारात वाळू तस्कर पसार झाले. पकडलेल्या जेसीबी व ट्रॅक्टरच्या नंबरवरून पोलीसांना आरोपींचा शोध घेत येईल. नागरीकांना असे काही निदर्शनास आले तर आम्हाला कळवावे नावे गुपीत ठेवू

– तृप्ती कोलते-पाटील, तहसीलदार हवेली

Back to top button