वडगाव-नानगाव पुलावर धोकादायक खड्डा | पुढारी

वडगाव-नानगाव पुलावर धोकादायक खड्डा

नानगाव; पुढारी वृत्तसेवा: नानगाव (ता. दौंड) व वडगाव रासाई (ता.शिरूर) या दोन तालुक्यांना जोडणार्‍या भीमा नदीवरील पुलावरील धोकादायक खड्ड्यांमुळे प्रवासी व वाहनचालकांची दिवसेंदिवस डोकेदुखी वाढत चालली आहे. सध्या या धोकादायक पुलाकडे संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींंनीचे दुर्लक्ष होत आहे. काही वर्षांपूर्वी या पुलाचे बांधकाम झाले आहे. दोन तालुक्यांना जोडणार्‍या या पुलामुळे मोठ्या प्रमाणावर वर्दळ होत आहे. मात्र, पुलावर मधोमध काही दिवसांपूर्वी धोकादायक खड्डा पडला आहे. या खड्ड्यातील खडी उखडली असून, लोखंडी सळया उघड्या पडलेल्या आहेत. लहान खड्ड्यांचे रूपांतर मोठ्या खड्ड्यात होत आहे.

सध्या पावसाळ्याचे दिवस असून, रस्त्यावरील खड्ड्यात पाणी होत आहे. लहान-मोठा पाऊस झाल्यावरदेखील या पुलावरील खड्ड्यात पाणी साठत असते. पाणी साठल्यामुळे खड्ड्यातील लोखंडी सळया पाण्यात झाकून जातात, तसेच खड्ड्याचा अंदाजदेखील येत नाही. रात्रीच्या वेळी तर हा खड्डा आणखी धोकादायक जाणवतो. खड्ड्यातील लोखंडी सळया उघड्या असल्याने व एखादी दुचाकी त्यावरून गेल्यावर दुचाकीच्या चाकामध्ये लोखंडी सळई अडकून अपघात होऊ शकतो. लवकरात लवकर पुलावरील खड्ड्याची दुरुस्ती व्हावी, अशी मागणी होत आहे.

माहिती देऊनही दुर्लक्ष
पुलावरील धोकादायक खड्ड्याच्या संदर्भात संबंधित विभागाला लेखी पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे, असे नानगावचे उपसरपंच संदीप खळदकर यांनी सांगितले. संबंधित विभागातील अधिकार्‍यांना अनेकदा तोंडी स्वरूपात माहिती देण्यात आली असून, लेखी निवेदनदेखील देण्यात येणार आहे, असे वडगाव रासाईचे सरपंच सचिन शेलार यांनी सांगितले.

Back to top button