धक्कादायक! वारंवार होणार्‍या वादातून पतीनेच केला पत्नीचा खून | पुढारी

धक्कादायक! वारंवार होणार्‍या वादातून पतीनेच केला पत्नीचा खून

शिक्रापूर : जातेगाव खुर्द (ता. शिरूर) येथे पतीने पत्नीशी वारंवार होणार्‍या वादातून पत्नीचा कशाने तरी मारहाण करून खून केल्याची घटना घडली. यामध्ये रूपाली सचिन खंडाळे या महिलेचा मृत्यू झाला असून, शिक्रापूर पोलिसांनी तिचा पती सचिन दत्तात्रय खंडाळे याला अटक केली आहे. जातेगाव खुर्द ता. शिरूर येथील सचिन खंडाळे व रूपाली खंडाळे या दांपत्यामध्ये सचिन दारू पीत असल्याने वाद होत होते.

2 ऑगस्ट रोजी सचिन याच्या आजोबांचा वर्षश्राद्धचा कार्यक्रम होता; मात्र सचिन त्या कार्यक्रमाला न थांबता रानातील पोल्ट्रीवर थांबला होता. त्याने पत्नी रूपाली हिलादेखील तेथे बोलवून घेतले होते, रात्री उशिरा रूपाली पती सचिनकडे पोल्ट्रीवर गेली असता त्यांच्यामध्ये वाद झाले. पहाटेच्या सुमारास रूपाली हिला शिक्रापूर येथील सूर्या हॉस्पिटल येथे आणले असता तिच्या डोक्यात तसेच गळ्यावर काही जखमा होत्या आणि ती मयत झालेली होती. याबाबत रूपालीचा भाऊ ललित दत्तात्रय गावडे (रा. गणेगाव खालसा, ता. शिरूर) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली.

Back to top button