जमिनीच्या वादातून चुलत्याची सुपारी; सात जणांवर गुन्हा दाखल | पुढारी

जमिनीच्या वादातून चुलत्याची सुपारी; सात जणांवर गुन्हा दाखल

रांजणगाव गणपती; पुढारी वृत्तसेवा: शिरुर तालुक्यातील टाकळकरवाडी येथील शेतजमिनीच्या वादातून चुलत्याचे हातपाय तोडण्याची सुपारी दिल्याप्रकरणी पुतण्यासह सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टाकळकरवाडी येथील अ‍ॅड. हनुमंत अंकुश टाकळकर यांच्या मोटारीवर हॉटेल धनगरवाडा परिसरात दि. 26 जुलैला रात्री साडेआठच्या सुमारास हल्लेखोरांनी दगड फेकले. तसेच दांडक्याने गाडी फोडली. यात हनुमंत टाकळकर जखमी झाले. रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत कसून तपासाचे आदेश दिले होते.

पोलिसांनी हर्षल सुभाष कोहकडे व प्रज्ज्वल दत्तात्रेय सातकर (दोघे रा. कारेगाव, ता. शिरूर) यांना ताब्यात घेत चौकशी केली असता वैभव आप्पा टाकळकर (रा. टाकळकरवाडी) याच्या सांगण्यावरून व त्याने दिलेल्या पन्नास हजार रुपयांच्या मोबदल्यात अभय अनिल टिंगरे (रा. टाकळकरवाडी), संकेत गुजर, अभी पवार, गौरव कराळे (पूर्ण नावे व पत्ते उपलब्ध नाहीत) यांनी अ‍ॅड. टाकळकर यांना मारहाण केल्याची व त्यांची गाडी फोडल्याची कबुली दिली. मुख्य आरोपी वैभव टाकळकरने शेतजमिनीच्या वादातून सुपारी दिल्याचे कबूूल केले. सदरची कारवाई पोलिस उपनिरीक्षक सुहास रोकडे, सहायक फौजदार दत्तात्रेय शिंदे, उमेश कुतवळ, विजय शिंदे यांनी केली.

Back to top button