बावडा : झोका खेळण्यासाठी चक्क जेसीबीचा वापर ! | पुढारी

बावडा : झोका खेळण्यासाठी चक्क जेसीबीचा वापर !

बावडा; पुढारी वृत्तसेवा: पंचमीचा उत्सव म्हटले की, झोका हा आलाच! झोक्याशिवाय पंचमीचा उत्सव पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे दोन जेसीबी यंत्रांच्या सहाय्याने झोका तयार करून पिठेवाडी (ता. इंदापूर) येथील तरुणांनी झोका खेळण्याचा मनसोक्त आनंद मंगळवारी (दि.2) लुटला. झोका हा नेहमी उंच झाडाच्या फांद्यांना दोर बांधून तयार केला जातो. अशा पद्धतीने तयार केलेल्या झोक्याचा श्रावण महिन्यात महिला व पुरुष आनंद लुटत असतात.

मात्र, वाढत्या शहरीकरणामुळे गावामध्ये उंच झाडे राहिलेली नाही, त्यामुळे अनेकदा मनात असूनही महिलांना व युवकांना नागपंचमी सणात झोका खेळता येत नाही. यावर पिठेवाडी येथील युवकांनी शक्कल लढवून दोन जीसीबी दोन्ही बाजूला उभे करून त्यास दोरखंड बांधून झोका तयार केला. या जेसीबीच्या झोक्याचा युवकांनी मनमुराद आनंद लुटला, असे शंकर शेंडगे यांनी सांगितले. बदलत्या काळामध्ये यांत्रिकीकरण वाढत असले तरी त्याचा वापर मानवी हितासाठी होत असल्याचे चांगले चित्र पाहायला मिळत आहे.

Back to top button