वाल्हे : गुंजवणी जलवाहिनीचा अधिकार्‍यांना विसर | पुढारी

वाल्हे : गुंजवणी जलवाहिनीचा अधिकार्‍यांना विसर

वाल्हे; पुढारी वृत्तसेवा: गुंजवणी प्रकल्पातील बंदिस्त जलवाहिनीचे काम पुरंदर तालुक्यात जुन्या सर्वेनुसार सुरू व्हावे, या मागणीवरून ऑक्टोबर 2021 पासून बंद ठेवण्यात आले, अधिकार्‍यांनी आश्वासन देऊनही शेतकर्‍याच्या मुख्य मागणीनुसार प्रत्यक्षात सर्वेक्षण करण्यात आले नसल्याने शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत. गुंजवणी धरण लाभक्षेत्रातील वाल्हे गावाचा काही भाग, तसेच पिंगोरी, आडाचीवाडी, पातरमळे, दौंडज, वागदरवाडी, सुकलवाडी तसेच इतर वाड्याना गुंजवणी धरणाच्या बंद जलवाहिनीचे पाणी मिळत नसल्याने वाल्हेकर ग्रामस्थ आक्रमक झाले होते. ग्रामस्थांनी 17 ऑक्टोबर 2021 मध्ये सर्वपक्षीय बैठक आयोजित करून सुरू असलेले गुंजवणी जलवाहिनीचे काम मांडकी (ता. पुरंदर) येथे जाऊन बंद पाडले होते.

खासदार सुप्रिया सुळे यांच्या निदर्शनुसार, 31 जानेवारी रोजी गुंजवणी पाणीप्रश्नांवर, सिंचन भवन पुणे येथे, पुरंदर तालुक्याचे शिष्टमंडळ व मुख्य अभियंता हनुमंत गुणाले यांमध्ये चर्चा झाली. या वेळी, माहूर, परिंचे, हरणी, वाल्हे , दौंडज, राख या गावांच्या पश्चिम उत्तर दिशेने चढाच्या बाजूने म्हणजेच 1993 सालच्या मूळ प्रवाही कालव्याच्या सर्वेक्षणानुसार मुख्य बंदिस्त जलवाहिनी टाकण्यास हनुमंत गुणाले यांनी तत्त्वतः मान्यता दिली.

मूळच्या लाभ क्षेत्रातील संपूर्ण लागवड योग्य क्षेत्राला पाणी देण्याची हमी व सुधारित प्रस्तावात शेतकर्‍यांनी हेक्टरी दीड लाख रुपये खर्चून स्व:खर्चाने ठिंबक सिंचन संच बसविणे सद्य:स्थितीत शेतकर्‍यांना परवडणारे नसल्यामुळे, सध्या ठिंबक सिंचन न करता सध्या मुख्य बंदिस्त जलवाहिनी वरील गावांच्या पश्चिम – उत्तर दिशेने पूर्ण करून त्या – त्या गावच्या ओढ्या नाल्यावरील बंधारे भरून घेण्याची व्यवस्था करणे या तीनही गोष्टींना, गुणाले यांनी तत्त्वत्तः मान्यता दिली होती.

मात्र, आतापर्यंत या पुढील कामाची कोणतीही कार्यवाही प्रत्यक्षात जागेवरती येऊन सर्वेक्षण झाले नसल्याने, गुंजवणीच्या बंदिस्त जलवाहिनीच्या कामास, जुन्या सर्वेनुसार तत्त्वतः मान्यता दिलेल्या अधिकार्‍यांचे आश्वासन हवेतच विरले का ? असा सवाल वाल्हे व परिसरातील शेतकर्‍यातून उपस्थित होत आहे. गुंजवणी धरणाच्या मुख्य बंदिस्त जलवाहिनी योजनेत बदल करून, मूळच्या खुल्या प्रवाही कालव्याच्या सर्वेनुसार, म्हणजेच वाल्हे (ता.पुरंदर) पश्चिम – उत्तर दिशेने चढाच्याच बाजूने करण्यात यावी. जुन्या कालव्याच्या सर्वेनुसार पाणी आले पहिजे.

गुंजवणी प्रकल्पातील बंदिस्त जलवाहिनीचे काम मूळच्या 1993 च्या मंजूर प्रवाही कालव्याच्या सर्वेनुसार, वाल्हे, परिंचे, हरणी, दौंडज, राख या गावांच्या उत्तरेकडील चढाच्या भागातून व्हावे. व बंदिस्त जलवाहिनीमुळे बचत झालेल्या पाण्याचा उपयोग मूळच्या 15 गावातील लागवड योग्य क्षेत्र ओलीताखाली आल्याशिवाय इतर गावांना पाणी देण्यास विरोध केला होता. वरील सर्व बाबी मान्य होत नाहीत, तोपर्यंत या गावात बंदिस्त जलवाहिनीच्या काम चालू द्यायचेच नाही, असे शेतकर्‍यांनी या वेळी ठरवले होते. यामुळे ऑक्टोबर 2021 पासून पुरंदर तालुक्यात सुरू असलेले बंदिस्त जलवाहिनीचे काम बंद ठेवण्यात आले.

Back to top button