
मंचर; पुढारी वृत्तसेवा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र केला जाईल, अशी घोषणा केली होती. परंतु, त्यांच्या एक ते दीड महिन्याच्या कालावधीत 100 ते 125 शेतकर्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी गुरुवारी (दि. 4) केला. केंद्र आणि राज्य सरकार कांदा उत्पादक शेतकर्यांना न्याय देत नसल्याच्या निषेधार्थ मंचरला पुणे – नाशिक रस्त्यावर आंबेगाव तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
गळ्यात कांद्याच्या माळा घालून शेतकरी त्यात सहभागी झाले होते. तत्पूर्वी मंचर बाजार समितीच्या आवारात झालेल्या सभेत तुपकर म्हणाले, राज्य व केंद्र सरकार शेतकर्यांवर अन्याय करीत आहे. सरकारने कांदा उत्पादक शेतकर्यांना हलक्यात घेऊ नये. पुढील आठ दिवसांत राज्य सरकारने कांद्याला अनुदान दिले नाही व केंद्र सरकारने निर्यातीला प्रोत्साहन दिले नाही तर राज्यातील शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर बांगर म्हणाले, कांदा उत्पादक शेतकरी बाजारभाव कोसळल्याने आत्महत्या करण्याच्या विचारापर्यंत येऊन पोहचला आहे, याचा विचार सरकारने न केल्यास राज्यव्यापी आंदोलन करू. या वेळी काशिनाथ दौडकर, लक्ष्मण गुंड, वनाजी बांगर, मारुती गोरडे, प्रकाश कोळेकर यांची भाषणे झाली. दरम्यान, मंचर बसस्थानकाजवळ बेकायदा रस्ता अडविल्याने शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्यांना मंचर पोलिसांनी ताब्यात घेतले.