कृष्णा चौकातील कामामुळे वाहतूक कोंडी | पुढारी

कृष्णा चौकातील कामामुळे वाहतूक कोंडी

पिंपरी : मुसळधार पावसामुळे नवी सांगवीतील कृष्णा चौकात पाणी तुंबत असल्यामुळे गटारीचे काम महापालिका प्रशासनाने हाती घेतले आहे. मात्र, संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे वाहनचालक वैतागले आहेत. त्यामुळे ही कामे त्वरित पूर्ण करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

मुळात पावसाळी गटारांची कामे पावसाळ्यापूर्वी होणे अपेक्षित असते. पण तत्कालीन भाजपचे नगरसेवक, महापालिका अधिकारी व ठेकेदार यांच्या अनास्थेमुळे पावसाळी गटाराची कामे केली गेली नाहीत. आता मात्र भर पावसाळ्यात या चौकातील पावसाळी गटाराचे काम हाती घेतले आहे. याचा फटका वाहचालक व पादचार्‍यांना बसत आहे.

नवी सांगवी व पिंपळे गुरव परिसरातील कृष्णा चौक हे मध्यवर्ती ठिकाण आहे. या चौकाच्या परिसरात अनेक हॉटेल्स, हॉस्पिटल्स, कापड दुकाने, भाजी मंडई, शालेय साहित्याची दुकाने, स्टेशनरी दुकाने आहेत. तसेच पिंपळे गुरवकडून पुणे शहर, हिंजवडी आयटी पार्ककडे जाणारा हा मुख्य रस्ता आहे. त्यामुळे सकाळी व सायंकाळी या रस्त्यावर मोठी रहदारी असते. आता याच रस्त्यावरील कृष्णा चौकात पावसाळी गटाराचे काम सुरू केले आहे.

Back to top button