पिंपरी : महापालिकेतर्फे पर्यावरण अहवाल सादर | पुढारी

पिंपरी : महापालिकेतर्फे पर्यावरण अहवाल सादर

पिंपरी : महापालिकेतील विविध विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, विविध शासकीय, निमशासकीय कार्यालये आदींकडून प्राप्त झालेली माहिती तसेच, स्कायलॅब संस्थेने शहरातील विविध ठिकाणी केलेल्या वायू, ध्वनी, पाणी आदींच्या चाचण्यांच्या निकषांवर सन 2021-22 चा पर्यावरण सद्यस्थिती अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यासाठी विविध शासकीय व वैज्ञानिक संस्थांचे सहकार्य लाभले.
शहराचे हवामान, तापमान, पर्जन्यमान, मानव संसाधन, लोकसंख्या, दळणवळण याबाबत या अहवालात माहिती देण्यात आली आहे.

शहरातील हरीत क्षेत्रांची सद्यस्थिती नमूद करण्यात आली आहे. हरीत क्षेत्रांच्या प्रमाणकांनुसार वृक्ष लागवड आणि उद्याने विकसित करण्यात आले असून, सन 2020-21 च्या तुलनेत सन 2021-22 मध्ये 3 टक्क्यांनी वाढ झाली आहे. शहरामध्ये आढळणार्‍या विविध जैवविविधतेपैकी काही नोंदी या अहवालात दर्शविण्यात आल्या आहेत. जैवविविधतेचे संवर्धन, घनकचरा व्यवस्थापनाची माहिती अहवालात आहे. सन 2021-22 मध्ये शहरात 8 लाख 58 हजार 75 किलो इतका जैव वैद्यकीय कचरा निर्माण झाला होता.

त्यावर प्रक्रीया करण्यात आली आहे. शहरात 36 घोषित झोपडपट्ट्या असून त्यामध्ये 78 हजार 299 लोक राहतात. तर 35 अघोषित झोपडपटट्या असून, त्यात 69 हजार 511 लोक वास्तव्यास आहेत. हा अहवाल अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, पर्यावरण व अभियांत्रिकी विभागाचे सहशहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे सादर केला. या वेळी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उल्हास जगताप, शहर अभियंता मकरंद निकम, सहआयुक्त आशादेवी दुरगुडे व अधिकारी उपस्थित होते.

शहरात बांधकाम क्षेत्रासह वायू प्रदूषणात वाढ
सन 2019-20 च्या तुलनेत शहरात सन 2020-21 मध्ये बांधकाम क्षेत्रात वाढ झाली आहे. शहरातील वाहनांच्या वाढत्या वापरामुळे हवेतील सल्फर डायऑक्साईडचे प्रमाण वाढले असल्याचे अहवालावरुन दिसून येते. शहराच्या विविध भागांमध्ये ध्वनी पातळी ही प्रदूषण मंडळाच्या विहित मर्यादेपेक्षा जास्त आहे. सन 2020-21 च्या तुलनेत सन 2021-22 मध्ये वाहनांच्या नोंदणी संख्येमध्ये वाढ झाली आहे. शहरात काही ठिकाणी पाण्याची गुणवत्ता प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विहित मर्यादेत नसल्याचे नदी, तलाव, भूजल नमूने तपासणी अहवालातून दिसून येते.

Back to top button